‘मेड इन चायना’ मिसाईलचा भरोसा नाही! नेम धरला तैवानवर पण जाऊन कोसळलं जपानवर | पुढारी

‘मेड इन चायना’ मिसाईलचा भरोसा नाही! नेम धरला तैवानवर पण जाऊन कोसळलं जपानवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी चीन एक पाऊल पुढे जात त्यांनी तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली. तैवान सरकारने याला दुजोरा दिला असून ही क्षेपणास्त्रे तैवानच्या सीमेजवळ डागण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे या 11 क्षेपणास्त्रांपैकी काही क्षेपणास्त्रे ही जपानमध्ये जाऊन कोसळल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर ‘मेड इन चायना’ क्षेपणास्त्रे मजेचा विषय बनली आहेत. काहीजण तर ‘जाना था तैवान पहुँच गये जपान’ अशी या क्षेपणास्त्रांची टींगल करत आहेत.

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडली आहेत. ही बाब गंभीर आहे असून ही बाब जपानच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी तैवानच्या हवाई क्षेत्रात 27 चीनी लढाऊ विमाने दिसली होती. त्यातच आता गुरुवारी चीनने तैवानला लक्ष्य करत त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागली. या त्यांच्या कृतीमुळे जागतिक सुरक्षेचा विषय चिंताजनक बनला आहे. मात्र, लष्करी सराव असल्याचे सांगून चीनने आपल्या कारवाईबाबत सारवासारव केली आहे. दुसरीकडे चीनच्या कारवाईनंतर तैवाननेही आपली क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय केली. त्यामुळे आणखी तणाव वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेने लिहिली तणावाची स्क्रिप्ट

चीन-तैवान या दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या तणावाची स्क्रिप्ट अमेरिकेने लिहिली आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यापासून चीनकडून धमक्यांचा सिलसिला सुरू झाला. आता पेलोसी तैवानमधून गेल्या आहेत, मात्र अमेरिकेच्या ‘एन्ट्री’मुळे दोन्ही देशांमधील वाद वाढला आहे. अधिकृत मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की चीनचे सैन्य 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान 6 वेगवेगळ्या भागात लष्करी सराव करणार आहे. त्यांनी तैवान बेटाला चारही दिशांनी वेढले आहे. ग्लोबल टाईम्सने चिनी तज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘चीनचा हा सराव अभूतपूर्व आहे कारण पीएलएची क्षेपणास्त्रे पहिल्यांदाच तैवान बेटावर उड्डाण करतील अशी अपेक्षा आहे.’

तैवान अमेरिकेवर विश्वास ठेवू शकेल का?

सध्या सुरू असलेला तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिका तैवानला मदत करण्याबाबत नक्कीच बोलत आहे, सुरक्षा देण्याची हमीही देत​आहे. पण सत्य परिस्थिती पाहता तैवान अमेरिकेवर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण रशिया-युक्रेन युद्धाच्या रूपात दिसून आले आहे. जिथे सुरुवातीला अमेरिका युक्रेनला सतत पाठिंबा देत होती. रशियाला थेट चिथावणी देत होती. पण युद्ध सुरू होताच अमेरिकेने तिथेही आपले सैन्य पाठवण्यास नकार दिला आणि केवळ रशियावर निर्बंधांची कारवाई केली.

ड्रॅगन जपानवर भडकलाय का?

तैवानबाबत चीनच्या विरोधात G-7 देशांच्या गटाकडून विधाने करण्यात आली आहेत. यानंतर चीन संतापला आहे. दरम्यान, कंबोडियातील आसियान कार्यक्रमाच्या निमित्ताने जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबतची बैठक चीनने रद्द केली आहे. या चीन-तैवानमधील वाढलेला तणाव शांततापूर्ण मार्गाने कमी व्हायला हवा, असे G-7 च्या बैठकीत जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते. G-7 देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

जपान आणि चीनमधील जुने वैर…

जपान आणि चीन यांच्यातील वैर नवीन नाही. 1931 मध्ये जपानने चीनच्या मंचुरियावर आक्रमण केले. जपानच्या हद्दीत झालेल्या स्फोटानंतर जपानने ही कारवाई सुरू केली होती. यानंतर जपानने चीनचे अनेक भूभाग ताब्यात घेतले. दरम्यान, चीनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले आणि जपान पहिल्या महायुद्धात गुंतले. मात्र, हे वैर संपले नाही. चीन या हल्ल्याला आपला अपमान मानतो.

Back to top button