CWG 2022: हिमाचलच्या रेणुका ठाकूरचा कहर, टीम इंडिया पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर | पुढारी

CWG 2022: हिमाचलच्या रेणुका ठाकूरचा कहर, टीम इंडिया पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर

पुढारी ऑनलाईन: हिमाचलची कन्या रेणुका सिंह ठाकूर हिने राष्ट्रकुल स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बार्बाडोसचा पराभव केला. टीम इंडियाच्या 163 धावांच्या लक्ष्यासमोर बार्बाडोसचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 62 धावाच करू शकला. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

विजयासाठी 163 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बार्बाडोस संघाला भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरने चांगलाच हिसका दाखवला. रेणुकाने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डॉटिनला क्लीन बोल्ड केले, तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर तिच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेली मॅथ्यूजला झेलबाद केले. तिला 9 धावा करता आल्या. झटपट विकेट्स पडत असल्याने धावसंख्या अचानक 5 षटकांत 4 बाद 19 अशी झाली. रेणुकाने सुरुवातीच्या चारही विकेट घेतल्या.

रेणुकाच्या संघर्षाची कहाणी

रेणुका सिंह हिचा जन्म शिमला जिल्ह्यातील रोहरू येथील परसा गावात झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील वारले. आपल्या मुलीने क्रिकेटर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. ते विनोद कांबळीचे मोठे चाहते होते. वडिलांच्या निधनानंतर ती गावात क्रिकेट खेळू लागली. नंतर तिची हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) च्या धर्मशाला अकादमीसाठी निवड झाली.

HPCA प्रशिक्षक पवन सेन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. 2019 या वर्षात रेणुकाने BCCI च्या महिला एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक 23 बळी घेतले. रेणुकाच्या अगोदर हिमाचलच्या दोन महिला खेळाडू भारतीय संघाचा भाग बनल्या आहेत. शिमल्याची सुषमा वर्माही भारतीय महिला संघात खेळली आहे. हरलीन देओलही भारताकडून खेळत आहे. रेणुका हिच्या दमदार कामगिरीने देशात आणि हिमाचलप्रदेशमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Back to top button