सत्ताधार्‍यांना परिवर्तन पॅनेलचे आव्हान | पुढारी

सत्ताधार्‍यांना परिवर्तन पॅनेलचे आव्हान

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची निवडणूक अविरोध करण्यास सत्ताधार्‍यांना अपयश आले. 18 पैकी 7 जागा अविरोध झाल्या असून उर्वरित 11 जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी सहकारी पॅनेलसमोर परिवर्तन पॅनेलने आव्हान निर्माण केले आहे. अनुसूचित जाती मतदारसंघातून विद्यमान संचालक व नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉक्टर मतदारसंघातून डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजयकुमार आरकाल, डॉ. सुदीप संभारम, महिला मतदारसंघातून विद्यमान संचालिका डॉ. लता मिठ्ठाकोल, माधवी चिट्याल, तर विशेष मागासप्रवर्ग/भटक्या विमुक्त मतदारसंघातून सुधाकर गुंडेली, अशा एकूण 7 जणांची अविरोध निवड झाली आहे.

वैयक्तिक प्रतिनिधी 5, संस्था प्रतिनिधी 5, डॉक्टर प्रतिनिधी 3, महिला प्रतिनिधी 2, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी 1, इतर मागासप्रवर्ग 1, विशेष मागासप्रवर्ग/भटक्या-विमुक्त प्रतिनिधी 1, अशा एकूण 18 जागा आहेत. 7 जागा अविरोध झाल्यानंतर 11 जागांसाठी निवडणूक लागली असून यामध्ये 23 उमेदवार रिंगणात आहेत.

सहकार पॅनेलला ‘नारळ’ चिन्ह

रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये संस्था मतदारसंघातून विनायक कोंड्याल, रमेश विडप, अविनाश बोमड्याल, मनोहर अन्नलदास, इरेशम कोंपेल्ली, वैयक्तिक मतदारसंघातून अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमुल तसेच ओबीसी गटातून सुरेश फलमारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून या पॅनेलला ङ्गनारळ’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

परिवर्तन पॅनेलला ‘कप-बशी’ चिन्ह

सत्ताधार्‍यांच्या सहकार पॅनेलसमोर विरोधातील परिवर्तन पॅनेलने आव्हान उभे केले आहे. या पॅनेलला ‘कप-बशी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. या पॅनेलने 11 पैकी केवळ 8 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅनेलतर्फे वैयक्तिक मतदारसंघातून गणेश पेनगोंडा, मनोहर इगे, श्रीनिवास कोंडा, व्यंकटेश दोंता, राजगोपाल विडप, संस्था मतदारसंघातून नागेश वल्याळ, श्रीहरी इराबत्ती, इतर मागासवर्गातून नागेश वल्याळ हे निवडणूक लढविणार आहेत.

अन्य अपक्ष उमेेदवार

दरम्यान, या निवडणुकीसाठी पात्र 23 उमेदवारांची यादी बुधवारी (दि. 6) प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये आनंद अंबाल, अंबादास तवटम, विजय दुध्याल या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मतदान 17 जुलैला होणार आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए. गावडे हे काम करीत आहेत.

Back to top button