पंढरपूर हमाल पंचायतच्या अध्यक्षपदी ढोले यांची निवड | पुढारी

पंढरपूर हमाल पंचायतच्या अध्यक्षपदी ढोले यांची निवड

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा सर्व हमाल, तोलार कामगार बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभा करणे गरजेचे असल्याचे सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे सहचिटणीस शिवाजी शिंदे यांनी हमाल कामगार बाधंवांच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीमध्ये सांगितले. ते पंढरपूर हमाल-मापाडी कामगारांच्या निवडी करताना बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर हमाल भवनमध्ये झालेल्या हमाल बाधंवांच्या बैठकीमध्ये पंढरपूर हमाल-मापाडी पंचायतचे अध्यक्ष म्हणून सिध्दनाथ ढोले यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी गजानन भुईटे व नवनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली.

वांदे कमिटी म्हणून हरिभाऊ कोळी व श्रीमंत डांगे यांची, तर संघटक म्हणून सचिन पोरे आणि सहसचिव म्हणून संतोष सावंत यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी जाहीर केली. संघटनेचे सल्लागार म्हणून सुभाष जाधव, उत्तरेश्‍वर गोपणे, पोपट शेंडगे, राजाराम ढोले, प्रकाश कदम, भीमा धनवे, कैलास गांडुळे, मधु वाघ, अंकुश कदम व राजेंद्र पवार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष सिध्दनाथ ढोले यांनी सांगितले की, डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळामार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी हमाल-मापाडी पंचायत मोठ्या प्रमाणात काम करीत आहे.

या सर्व हमाल बांधवांच्या अडीअडचणी सोडवून अनोंदीत कामगारांना नोंदीत करुन माथाडी बोर्डातून त्यांचे पगार काढण्यासाठी व संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर सर्व पदाधिकार्‍यांचे सत्कार जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे व मार्केट कमिटीचे संचालक आबाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर हमाल-मापाडी पंचायतचे कामगारबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button