महायुतीची बाजी; 30 जागांवर विजय शक्य | पुढारी

महायुतीची बाजी; 30 जागांवर विजय शक्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असून, महायुती व महाविकास आघाडी दोन्ही प्रमुख आघाड्या आपापल्या विजयाचे दावे करीत आहेत. मात्र, एबीपी-सी व्होटर सर्व्हे आणि टीव्ही 9 वृत्तसमूह यांनी स्वतंत्रपणे केलेल्या सर्वेक्षणात महायुतीच राज्यात बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. दोन्ही सर्वेक्षणांमध्ये राज्यातील 48 पैकी 28 ते 30 जागा महायुती, तर महाविकास आघाडी उर्वरित 18-20 जागांवर जिंकत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही सर्वेक्षणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा सुपडा साफ होत असल्याचेही स्पष्ट चित्र दिसत असल्याने अजित पवार यांच्यासाठी हे सर्वेक्षण चिंता वाढवणारे ठरू शकते. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही एकही जागा जिंकणार नसल्याचे दोन्ही सर्वेक्षणांत स्पष्ट झाले आहे.

भाजपकडून 45 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच महाविकास आघाडीही आम्हालाच घवघवीत यश मिळेल, असा दावा करीत आहे. त्यामुळे 18 व्या लोकसभा निवडणुकांचा निकाल काय लागणार, याची उत्कंठा सर्वांनाच आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांमधून महायुतीच राज्यात सर्वाधिक जागा जिंकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एबीपी-सी व्होटर सर्व्हेत महायुतीला 30 जागा

महायुतीला 30 जागांवर विजय मिळत असल्याचा स्पष्ट अंदाज एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणाने वर्तवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीत भाजपला 22 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा मिळू शकतात. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या जागांवर महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा निकाल दिसू शकतो, असा अंदाजही एबीसी- सी व्होटरने वर्तविला आहे. महाविकास आघाडीचे 18 जागांवर उमेदवार विजयी होतील, असा अंदाजही या सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा भोपळाच असल्याचा अंदाज आहे.

अजित पवारांचा सुपडा साफ होणार?

अजित पवारांच्या पक्षाचे खातेही उघडणार नसल्याचे एबीपी व टीव्ही 9 या दोन्ही वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणात दिसून येत आहे. अजित पवारांना जागा वाटपातून मिळालेल्या चारही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज दोन्ही सर्वेक्षणांनी वर्तविला आहे.

एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीच्या 18 जागा

अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बारामती, भिवंडी, बुलडाणा, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, माढा, नांदेड, नंदूरबार, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी, रायगड, सातारा, शिर्डी, शिरूर, यवतमाळ-वाशिम या 18 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे दिसून येते. तर अहमदनगरमध्ये नीलेश लंके आघाडीवर राहतील, तर सांगलीत चंद्रहार पाटील यांना धक्का बसेल, असा अंदाज आहे.

एबीपी सी व्होटर सर्व्हेनुसार महायुतीच्या 30 जागा

अकोला, अमरावती, बीड, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, जळगाव, जालना, कल्याण, कोल्हापूर, लातूर, मावळ, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रामटेक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रावेर, सांगली, सोलापूर, ठाणे आणि वर्धा या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहतील, असे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

टीव्ही 9 च्या सर्वेक्षणात महायुतीला 28 जागा

टीव्ही 9 च्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला 28 जागा मिळत आहेत. भाजप 25, शिंदे शिवसेना 3 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) पक्ष 10 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि काँग्रेस प्रत्येकी 5 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 च्या सर्व्हेनुसार पक्षनिहाय मतदारसंघ

भाजप- उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, पुणे, सांगली, सातारा, नांदेड, जालना, बीड, छ. संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रावेर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
शिवसेना (शिंदे) – रामटेक, बुलडाणा व कल्याण.
शिवसेना (ठाकरे)- ईशान्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, हातकणंगले, मावळ, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद), हिंगोली, यवतमाळ-वाशिम, शिर्डी, रायगड.
राष्ट्रवादी (शरद पवार)- बारामती, शिरूर, माढा, वर्धा, अहमदनगर, दिंडोरी.
काँग्रेस- कोल्हापूर, सोलापूर, लातूर, चंद्रपूर.

सर्वेक्षण                     महायुती            मविआ
एबीपी-सी व्होटर            30                  18
टीव्ही 9                        28                   20

Back to top button