Lok Sabha Election 2024 : आघाडीत बिघडले होते… महायुतीत पुन्हा जुळले! | पुढारी

Lok Sabha Election 2024 : आघाडीत बिघडले होते... महायुतीत पुन्हा जुळले!

गणेश जेठे

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यातील राजकीय वाद तसा महाराष्ट्राला ज्ञात आहे. चार महिन्यांपूर्वी केसरकर जेव्हा कणकवलीत राणे यांच्या बंगल्यावर जाऊन भेटले, तेव्हा तो वाद अर्धाअधिक मिटला होता. रविवारी राणे यांनी केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने हा वाद पूर्णपणे संपला आहे. 14 वर्षांपूर्वी राणे आणि केसरकर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये होते, तेव्हा त्यांच्यातील संबंध बिघडले होते, ते इतक्या वर्षांनी जुळले आहेत. राणे व केसरकर एकत्र आल्याने सावंतवाडीच्या राजकारणात खूप काही घडणार, हे नक्की!

राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू वा मित्र नसतो, असे म्हणतात. राजकारणात दोन नेत्यांमध्ये शत्रुत्व असणे किंवा मैत्री असणे, याचा मोठा परिणाम अनेक गोष्टींवर घडत असतो. विकास, कायदा व सुव्यवस्था, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य या बाबी त्यादृष्टीने महत्त्वाच्या.

जेव्हा केसरकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष होते, तेव्हा राणे आणि केसरकर यांचे सलोख्याचे संबंध होते. राणे काँग्रेसमध्ये, तर केसरकर राष्ट्रवादीत होते. अगदी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणे यांनी केसरकर यांचा प्रचार करत. तथापि, केसरकर आमदार बनल्यानंतर हळूहळू राणे व केसरकर यांच्यात दरी निर्माण झाली. निधीचे वाटप हे त्यामधील कारण सांगितले गेले. सत्तेत असूनही आपल्या मतदार संघाला निधी दिला जात नाही, अशी तक्रार केसरकर त्यावेळी करत होते. जिल्ह्याचे पालकत्व त्यावेळी राणे यांच्याकडे होते.

केसरकरांनी शब्द खरा ठरवला

जिल्हा नियोजन समिती सभागृहात राणे आणि केसरकर यांच्यात खटके उडू लागले होते. एका सभेत केसरकर यांनी राणे यांना उद्देशून ‘आज तुम्ही पालकमंत्री आहात, भविष्यात मीही पालकमंत्री असू शकतो,’ असे भर सभागृहात सांगितले होते. हा वाद वाढत असतानाच केसरकर यांनी राष्ट्रवादीतून निवडून आणलेले पाच जिल्हा परिषद सदस्य राणेंच्या पक्षात गेले होते. ही घटना केसरकर यांच्या खूप जिव्हारी लागली होती. तेथूनच केसरकर यांचे राष्ट्रवादीत बंड सुरू झाले. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा आदेश डावलून केसरकरांनी काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला. अर्थातच केसरकर यांना राष्ट्रवादीची साथ सोडावी लागली. शिवसेनेचे शिवबंधन त्यांनी बांधून घेतले. त्या निवडणुकीत नीलेश राणे यांचा पराभव झाला आणि विनायक राऊत यांचा विजय. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत केसरकर शिवसेनेतून विजयी झाले. पाठोपाठ सिंधुदुर्गचे पालकमंत्री बनले. नियोजन समितीच्या सभागृहात तोंडातून बाहेर पडलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. तिथून पुन्हा एकदा दोघांमधील संघर्षाला धार आली.
2014 ते 2022 सालातील शिवसेनेत फूट पडेपर्यंतच्या काळात या दोन्ही नेत्यांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. सिंधुदुर्गवासीयांना तर तो रोजच दिसत होता. दोघेही नेते या काळात एकमेकांवर शरसंधान साधत राहिले. आरोप-प्रत्यारोप करत राहिले. जेव्हा केसरकर शिवसेनेतील फुटीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन महायुतीत सामील झाले, तेव्हा वातावरण हळूहळू निवळत गेले. त्यात लोकसभेची उमेदवारी राणे यांना मिळाली तर त्यांना निवडून आणू, असे वक्तव्य केसरकर यांनी केल्यानंतर हा वाद मिटण्यास आणखी गती मिळाली. रविवारच्या सावंतवाडीतील भेटीने अखेर वाद संपला आहे.

पुढे काय घडणार?

केसरकर मागच्या 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत जाहीरपणे म्हणाले होते… ही माझी शेवटची निवडणूक. तसे झाले नाही. केसरकर चौथ्यांदा लढण्याच्या तयारीत आहेत. अर्थात, त्यासाठी राणे यांची त्यांना मदत मिळू शकेल. शिवसेनेतील फुटीबरोबरच केसरकर यांच्या ताकदीतही विभागणी झाली आहे. ती राणे यांच्या मदतीने भरून निघू शकेल. त्याचवेळी या दोघा नेत्यांच्या एकत्रित ताकदीचे आव्हान ठाकरे शिवसेनेसमोर निर्माण झाले आहे. एका बाजूला किरण सामंत उमेदवारीसाठी ताकद लावत असताना, दुसर्‍या बाजूने केसरकर यांची भूमिका सामंत किती स्वीकारतील, यावर शिवसेनेत असलेल्या सामंत-केसरकरांमधील भविष्यातील राजकीय संबंध अवलंबून राहतील.

गेले दशकभर केसरकर यांच्या राजकारणात अनेक बाबींबरोबरच राणे विरोध हाही एक फॅक्टर होता, तो आता संपला आहे आणि केसरकर यांना राऊत विरोध हा फॅक्टर वापरावा लागणार आहे. राणे आणि केसरकर यांच्यातील वाद मिटला, तरी त्या भागातील दोघांच्या समर्थकांमध्ये एकमत घडवून आणण्याचे आव्हान मोठे आहे. लोकसभा निवडणुकांमधील निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुका लागेपर्यंत राज्याच्या राजकारणात जे काही घडेल, त्या परिस्थितीत मार्ग शोधण्याचे आव्हान राणे व केसरकरांसमोर असेल. शेवटी राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. हा खेळ कसा खेळायचा हे केवळ राजकीय नेते ठरवत नाहीत, मतदारही ठरवत असतो.

राजन तेली चर्चेत

राजन तेली हे सावंतवाडीच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव बनले आहे. दोनवेळा त्यांनी केसरकरांशी झुंज दिली. आता तिसर्‍यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरण्याची तयारी त्यांची आहे. अधूनमधून मित्रपक्षात असलेल्या केसरकर यांच्यावर टीकेचे बाण ते सोडतच असतात. परवाच्या नाराजीच्या स्टेटसवरून ते पुन्हा चर्चेत आले. राणे यांची ताकद घेऊन केसरकर पुढे सरसावत असले, तरी राजन तेली आपली राजकीय पावले कशी टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहेच.

Back to top button