Lok Sabha Election 2024 : भाजपपुढे जागा राखण्याचे आव्हान | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपपुढे जागा राखण्याचे आव्हान

बेळगाव वार्तापत्र : शीर्ष नेतृत्वाने दुसरी फळी तयार केली नाही तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे बेळगाव लोकसभा मतदारसंघ. सामान्य कार्यकर्ता ते रेल्वे राज्यमंत्री अशी झेप घेतलेल्या सुरेश अंगडी यांनी आपल्यानंतर कोण याचा विचार केला नसावा. त्यामुळेच कोरोनाने त्यांचे निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपला उमेदवार आयात करावा लागला आहे. त्यामुळेच भाजप यंदा विजयाचा पंचक साधणार की काँग्रेस विजयाचा पंच मारणार, ही उत्सुकता आहे. (Lok Sabha Election)

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव मतदार संघात 90 च्या दशकात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. रयत संघटनेच्या माध्यमातून बाबागौडा पाटील यांनी काँग्रेसची सत्ता उलथवताना विजय मिळवला आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री पदही मिळवले. असा हा बेळगाव मतदारसंघ 2004 पासून गेल्या चारही निवडणुकांमध्ये भाजपकडेच राहिला आहे आणि विजयी उमेदवार राहिले आहेत सुरेश अंगडी. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पदही मिळाले. तथापि कार्यकर्ता ते मंत्रिपद अशी झेप घेतलेल्या अंगडी यांना काही भरीव करून दाखवण्यापूर्वीच कोरोनामुळे या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर पोटनिवडणुकीत अंगडी यांच्या पत्नी निवडून आल्या खर्‍या; पण भाजपचे मताधिक्य सव्वा लाखावरून चार हजार पर्यंत घसरले. 2024 मध्ये त्यामुळेच खासदार मंगल अंगडी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र आश्चर्य म्हणजे येथे जागी बेळगाव जिल्ह्यातील एखाद्या नेत्याला उमेदवारी न देता भाजपने इथून माजी मुख्यमंत्री आणि हुबळीचे नेते जगदीश शेट्टर यांना आयात केले. शेट्टर यांना त्यांच्याच विधानसभा मतदार संघात भाजपने 2023 मध्ये विधानसभा उमेदवारी नाकारली होती आणि त्यामुळे शेट्टर काँग्रेसमध्ये गेले होते, काँग्रेसकडून विधानसभा लढले आणि हरलेही.

हा फक्त एक वर्षांपूर्वीचा इतिहास लक्षात घेतला, तर शेट्टर यांना लोकसभेची उमेदवारी आणि तीही दुसर्‍या जिल्ह्यांतून का देण्यात आली, हे कोडे आहे.

बेळगाव जिल्ह्यात डॉ. प्रभाकर कोरेंसारखे दिग्गज नेते असताना आणि त्यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असताना भाजपने हा कटू निर्णय घेतला आहे. त्याची फलनिष्पत्ती काय, हे येणारा काळच सांगेल. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांमध्ये निरुत्साह आहे. नेमका तो कॅश करण्यासाठी काँग्रेसने इथून राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल यांना उमेदवारी दिली आहे. मृणाल यांची ही कोणत्याही स्तरावरची पहिली निवडणूक. त्यामुळे नवा नेता विरुद्ध माजी मुख्यमंत्री, अशी ही लढत रंगवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक नेता विरुद्ध बाहेरचा, असे चित्र उभा करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. नाराज असलेल्या भाजप नेत्यांचीही काँग्रेसला मदत होण्याची शक्यता अगदीच नाही असं म्हणता येत नाही. त्याचं कारण म्हणजे कितीही झालं तरी शेेट्टर वर्षभर काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे फक्त निवडणुकीसाठी त्यांनी पक्ष बदलला आणि मतदारसंघ बदलला, अशी टीका त्यांच्यावर होऊ शकते.
भाजपकडून जगदीश शेट्टर यांचे नाव चर्चेला येताच बेळगावात ‘शेेट्टर गो बॅक’ ही मोहीम भाजप कार्यकर्त्यांनी राबवली होती. त्यामागची नाराजी आणि राग लक्षात घेतला शिवाय 2021 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे घसरलेले मताधिक्य लक्षात घेतले, तर यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, हे निश्चित.

बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर हे दोन ज्येष्ठ मंत्री आहेत. जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका हीसुद्धा चिकोडी मतदार संघातून लढत आहे आणि दोघांच्या विजयाची जबाबदारी काँग्रेसने दोन्ही मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यातही जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जारकीहोळींवर जास्त जबाबदारी आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री पद कधी ना कधी मिळवायचे, ही जारकीहोळी यांची इच्छा लपून राहिलेली नाही. अगदी आताही त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात दलित मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे वक्तव्य केले आहे. परिणामतः बेळगाव मतदार संघात हे दोन्ही मंत्री प्रतिष्ठा पणाला लावून उतरले आहेत.

भाजप आणि काँग्रेसच्या या संघर्षात महाराष्ट्र एकीकरण समिती रिंगणात उतरली, तर त्याचा थेट फायदा काँग्रेसला होईल, जसा तो 2021 च्या पोटनिवडणुकीत झाला होता. त्यावेळी समिती उमेदवाराने लाखाच्या वर मते घेतली होती. त्यामुळे यंदाही समितीची मते निर्णायक ठरतील. अर्थात, समिती ही निवडणूक लढवणार की नाही, हे अजून निश्चित व्हायचं आहे. मतदान सात मे रोजी असल्यामुळे अजून त्यासाठी बराच अवधी आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपमधील संघर्षामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. समिती पूर्ण ताकदीनिशी उतरली तर ते आणखी संघर्षमय होईल, यात शंका नाही.

Back to top button