सातारा : दिवसा जमावबंदी; रात्री संचारबंदी

सातारा : दिवसा जमावबंदी; रात्री संचारबंदी
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. इयत्ता दहावी, बारावी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत. सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

जिल्ह्यात असे निर्बंध राहणार

पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई आहे.

कार्यालयांवर निर्बंध

सरकारी कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. मुख्यालयाबाहेरून येणार्‍या उपस्थितांसाठी कॉन्फरन्सद्वारे बैठका आयोजित कराव्यात. गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देऊन कर्मचार्‍यांची संख्या कमी करावी. तसेच कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यासाठी कामाच्या वेळांमध्ये बदल करावेत. कार्यालयात पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा 24 तास असल्याने रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करताना ओळखपत्र दाखवल्यास परवानगी दिली जाईल. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांनाच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास परवानगी आहे. कार्यालयात थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर आवश्यक आहे.

लग्न समारंभ, अंत्यसंस्कारावर मर्यादा-जमावबंदी

लग्न समारंभासाठी तहसीलदारांची परवानगी बंधकारक आहे. लग्‍नासाठी जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. अंत्यसंस्कार आणि अंतिम संस्कार कार्यक्रमामध्ये 20 लोकांना उपस्थित राहता येईल. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय संमेलन किंवा कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहण्यास पवानगी आहे. त्यासाठीही तहसीलदारांची परवानगी गरजेची आहे.

शाळा, महाविद्यालये, क्लासेस बंद

शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस 15 फे्रबुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम, प्रशासकीय कामकाज व शिक्षकांचे अध्यापनाव्यतिरिक्‍त करायचे कामकाज यासह कोणत्याही अन्य विभागाकडून राबवण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम सुरु राहतील.

केश कर्तनालयांवर मर्यादा

केश कर्तनालये 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत केशकर्तनालये पूणर्र्पणे बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. केशकर्तनालयामध्ये कोविड नियम व लसीकरणाचा नियम लागू राहणार आहे. जलतरण तलाव, जीम, स्पा, वेलनेस सेंटर आणि सौंदर्य केंद्रे पूर्णपणे बंद राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धांवर निर्बंध

नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा अटी शर्तींवर सुरू राहणार आहे. शहर किंवा जिल्हास्तरीय क्रीडा शिबिरे, स्पर्धा, क्रीडा कार्यक्रमास मनाई आहे.

उद्याने, पर्यटनस्थळे बंद

मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, वस्तू संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे तसेच कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद राहणार आहेत.

शॉपिंग मॉल्स, बाजार समिती

शॉपिंग मॉल्स, बाजारसमिती, नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. संबंधित आस्थापनांनी पूर्ण क्षमतेची माहिती, वर्तमान अभ्यागतांची संख्या सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी आस्थापनांनी कर्मचारी नेमावेत. पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेशास परवानगी दिली जाणार आहे. रात्री 10 ते सकाळी 8 या कालावधीत संबंधित आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.

प्रवासासाठी कोरोनाचाचाचणी आवश्यक

कोविडविरोधी दोन लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल प्रवास करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. वाहनचालक, वाहक आणि अन्य कर्मचार्‍यांनाही हेच नियम लागू राहणार आहेत. माल वाहतूक, औद्योगिक उपक्रम, बांधकाम उपक्रम फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्‍तींद्वारे नियमित वेळेनुसार सुरु ठेवण्यास परवानगी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून नियमित वेळेनुसार पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्‍तींना प्रवास करण्यास परवानगी आहे.
राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र प्रवासावेळी आवश्यक आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांना विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथून वैध तिकिटासह प्रवास करता येईल. 24 तास सुरु असणार्‍या कार्यालयांसाठी, विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचार्‍यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.

दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा श-लेााशीलश मध्ये गुंतलेल्या कोणत्याही आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांचे पूर्ण लसीकरण असणे बंधनकारक असेल. या बाबी तपासण्याची सर्व जबाबदारी संबंधित आस्थापना व व्यवस्थापनाची आहे. अन्यथा त्या व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल. नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापना बंद करण्यात येतील.
कोरोना नियमांचे उल्‍लंघन, प्रवासावेळी नियमात कसूर करणार्‍यांना 500 रुपयांचा दंड होणार आहे. आस्थापना किंवा संस्थांनी नियम मोडल्यास 10 ते 50 हजारांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. प्रवासात नियम उल्‍लंघन करणार्‍या परिवहन एजन्सीला10 हजार रुपये दंड केला जाणार आहे. सातत्याने नियम उल्‍लंघन केल्यास मालकास अटक केली जावू शकते. कोरोना नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे शेखर सिंह यांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news