पुणे पुढारी वृत्तसेवा : फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या तगाद्याला, महिन्याभरापूर्वी पत्नीचा झालेला मृत्यूमुळे आणि उसने दिलेले दोन लाख रूपये परत मिळत नसल्याने सहायक पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील हरपळे वस्ती येथे सोमवारी दुपारी घडला.
राजेश महाजन (रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाजन हे मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. त्यांनी मृत्यूपूर्व एक चिठ्ठी लिहून ठेवल्यानंतर त्यामध्ये त्यानी गळफास घेऊन तीन कारणांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते ती कंपनी वारंवार कर्जासाठी तगादा लावत होती. तसेच त्यांनी दोन लाख रूपये उसणे दिले होते. ती व्यक्ती उसणे दिलेले पैसे परत देत नव्हती.
त्याबरोबरच एक महिन्यापूर्वीच राजन महाजन त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याचे दुःख सहन न झाल्याने ते नैराश्यात होते अशा कारणांमधूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिठ्ठीत नमूद केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.