लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील गजबजलेल्या भागात घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील राम मंदिर ट्रस्टी विष्णू निकम यांच्या घरी हातात धारदार शस्त्र असलेल्या सहा चोरट्यांनी जबरी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.
लासलगाव शहरासह परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. चोरी करण्यासाठी येत असताना धारदार शस्त्र हातात असलेले अज्ञात चोरटे जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. १५८ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच अंदाजे ३ लाख रुपये रोख रुक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लासलगाव येथील अहिल्याबाई होळकर किल्ल्याच्या पाठीमागील भागात पहाटे सव्वादोन वाजेच्या दरम्यान अज्ञात सहा चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने सर्व घरांची पाहणी करत लासलगाव येथील राम मंदिर ट्रस्टी विष्णू निकम यांच्या घरी घरफोडी केली.
विष्णू निकम आणि मुलगा संदीप आपल्या रुममध्ये झोपले असताना अज्ञात धारदार शस्त्र असलेले सहा चोरट्यांनी गेट वाकवून घराचा कडीकोंडा कापून घरात प्रवेश केला. हॉलमधील शोकेस व बाजूचे लाकडी कपाट मधील कपे तोडून त्यातील १५८ ग्रॅम वजन असलेले सोन्याचे दागिने तसेच पोस्टाचे आरडी कलेक्शनची रक्कम असे अंदाजे ३ लाख रुपये रोख रुक्कम असा एकूण ४ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेत पोबारा केला.
पहाटे विष्णू निकम उठले असतात एवढ्या पहाटे घराचे दार कोणी उघडले म्हणून पाहणी करण्यासाठी खाली आले. आपल्या घरात चोरी झाल्याचे समजताच आरडाओरडा केल्याने मुलगा संदीप तसेच शेजारील धावपळ करत आले. जबरी चोरी झाल्याचे समजले. या चोरीची माहिती लासलगाव पोलिसांना समजता निफाडचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वरिष्ठांना माहिती दिली. श्वानपथक व ठसे तज्ञांना प्राचाराण करण्यात आले. मात्र पाहिजे तसा काही फायदा झाला नसल्याचे दिसून आले. चोरीची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली. अज्ञात सहा चोर चोरी करण्यासाठी घराची पाहणी करत होते त्यावेळी जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अज्ञात धारदार शस्त्र असलेले सहा चोरटे कैद झाले.
याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास सुरु केला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असलेले हे चोरटे आपल्याला दिसल्यास लासलगाव पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांनी केले.