हत्तीच्या कातडीतूनही रक्त पिणारी आफ्रिकेतील माशी!

हत्तीच्या कातडीतूनही रक्त पिणारी आफ्रिकेतील माशी!

डोडोमा : आफ्रिका खंड हा अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न आहे. या ठिकाणी अत्यंत घातक मुंग्यांपासून ते सर्पांपर्यंत अनेक जीव पाहायला मिळतात. त्यामध्ये जगातील सर्वात खतरनाक माशी चा समावेश होतो. 'सेतसी' किंवा 'तेतसी' अशा नावाने ओळखली जाणारी ही माशी माणसासाठीही धोकादायक ठरू शकते. या माशीचा डंख इतका मजबूत असतो की हत्तीच्या कातडीतूनही तो आरपार जाऊन रक्त शोषून घेऊ शकतो!

या माशीच्या दंशाने एक प्रकारचा झोपेशी संबंधित आजार होतो. त्याला 'आफ्रिकन स्लीप सिकनेस' असे म्हटले जाते. ही माशी ज्यावेळी एखाद्या माणसाला दंश करते त्यावेळी 'ट्रिपनोसोमा' नावाच्या परजीवीला शरीरात सोडते. हा परजीवी इतका धोकादायक असतो की वेळीच उपचार केले नाहीत तर माणसाचा जीवही जाऊ शकतो.

आफ्रिकेच्या ट्रॉपिकल आणि सब-ट्रॉपिकल भागात सेतसी माशीच्या एकूण 21 प्रजाती आढळतात. सर्वसाधारणपणे सहारा आणि कलहारी वाळवंटाच्या मध्ये असलेल्या मध्य आफ्रिकेत या माश्या आढळतात. माणसं आणि प्राण्यांचे रक्त पिऊनच या माशा जिवंत राहतात.

आफ्रिकेच्या सुमारे 37 देशांमध्ये सेतसी माशीचा उच्छाद पाहायला मिळतो. 'आफ्रिकन स्लीप सिकनेस' हा चेतासंस्थेशी निगडीत एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होते.

ही माशी 8 ते 15 मिलीमीटर लांबीची असते व तिचा रंग लालसर-तपकिरी असतो. तिच्या पंखांवर कुर्‍हाडीसारखाच आकार असतो जो तिला अन्य माशांपासून वेगळा करतो. तसेच त्यांच्या डोक्याच्या पुढील भागात सोंडेसारखा आलेला प्रोसोकिसचा भागही वेगळा असतो. मादी माशी संपूर्ण जीवनकाळात केवळ एकदाच नराशी मीलन करते व पूर्णपणे विकसित दहा लार्व्हांना जन्म देते. त्यांचा जीवनकाळ एक ते अडीच वर्षे असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news