मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकारी मालमत्तांचे नॅशनल मॉनेटाईझेशन पाइपलाइन (NMP) च्या नावाखाली केले जाणारे खासगीकरण हा नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने लावलेला एक भव्य सेल आहे अशी टीका पी चिदंबरम यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशामध्ये आपल्या काही उद्योगपती मित्रांची मोनोपॉली तयार करण्यासाठी हा केला जाणारा खटाटोप आहे. मागील ७० वर्षांत काँग्रेसने सत्तेत असताना काहीच केले नाही. असे गेली ७ वर्षे बरळणारे मोदी सरकार आता काँग्रेसने सत्तेत असताना ज्या गोष्टी ज्या स्वायत्त संस्था व मालमत्ता उभ्या केल्या त्यांनाच विकायला निघाले आहे. म्हणजेच एका अर्थी त्यांनी मान्य केले आहे की, हा विकास काँग्रेसनेच केलेला आहे. असंही चिदंबरम म्हणाले.
जेएनपीटी, एयरपोर्ट, रेल्वेज सारख्या देशातील सरकारी संस्था खासगीकरणाच्या नावाखाली विकायला काढल्या आहेत. याला त्यांनी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन (NMP) असे नाव दिलेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात आम्ही या सरकारी मालमत्ता विकत नाही आहोत, तर या सर्व मालमत्ता आम्ही खासगी उद्योजकांना भाडेतत्वावर चालवायला देत आहोत. असंही ते म्हणाले.
देशाला यातून ६,००,००० कोटी महसूल मिळणार आहे. पण असे सांगून देशातील जनतेची धूळफेक करत आहेत. नॅशनल मॉनेटाईझेशन पाइपलाइन (NMP) च्या नावाखाली त्यांनी या सरकारी मालमत्ता एक प्रकारे विक्रीसाठी काढलेल्या आहेत. NMP च्या नावाखाली केले जाणारे खासगीकरण हा नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने लावलेला एक भव्य सेल आहे, अशी जहरी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.