नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सज्जन कुमार दिल्लीतील 1984 च्या शीखविरोधी दंगलीत सहभाग घेतल्याप्रकरणी मंडावली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
सज्जन कुमार यांची तब्येत स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे, त्यामुळे जामीन देण्याचे कोणतेही कारण नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजय कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली.
वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आपल्या अशिलांवर उपचार करावयाचे असून त्यासाठी परवानगी दिली जावी, असा युक्तीवाद कुमार यांच्या वकिलांकडून करण्यात आला.
यावर तुमच्या अशिलाने गंभीर गुन्हा केलेला आहे. त्यांना आम्ही व्हीआयपी वागणूक द्यावी, असे आपणास वाटते का? असा प्रतिप्रश्न न्यायालयाने केला.
सज्जन कुमार यांच्या प्रकृतीच्या अनुषंगाने न्यायालयाने याआधीच सीबीआयकडून अहवाल मागविला होता. त्यात कुमार यांची प्रकृती स्थिर असून ती सुधारत असल्याचा शेरा मारण्यात आला होता.
दिल्लीतील राज नगर भागात झालेल्या शीखविरोधी दंगलीचे नेतृत्व केल्याचा आरोप शाबित झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सज्जन कुमार यांचे शिक्षेविरोधातले अपिल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
हे ही वाचलं का?