मुखेड (नांदेड); पुढारी वृत्तसेवा : शहीद लेफ्टनंट कमांडंट सुधाकर शिंदे : नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत मुखेड तालुक्यातील बामणी येथील भूमिपुत्र व आयटीबीपी लेफ्टनंट कमांडंट सुधाकर शिंदे हे काल (दि. २०) रोजी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जवळ शहीद झाले होते.
त्यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिराने त्यांच्या मूळ गावी पोहोचणार असल्याने उद्या रविवारी (दि.२२) रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद जवळील बामणी गावचे भूमिपुत्र सुधाकर शिंदे यांचे शिक्षण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत पार पडले. प्राथमिक शिक्षण मुक्रामाबाद येथे तर पदवीचे शिक्षण परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले. त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या हातून देश सेवा व्हावी अशी त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली होती. यासाठी ते अभ्यासासोबत शारीरिक क्षमते वाढविण्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देत होते.
गावाकडची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांनी कृषी विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेतले. सन २००२ मध्ये त्यांना कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त झाली. यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी देण्यास सुरुवात केली.
सन २००२मध्ये महाराष्ट्र शासनात पोलिस दलामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्याच काळात केंद्रशासनाच्या आयटीबीपी विभागात जागा उपलब्ध झाल्याने त्यांनी आयटीबीपी साठीची स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. यानंतर त्यांच्या कार्याची दखल आयटीबीपी विभागाने घेऊन त्यांना प्रमोशन मिळाले होते. आयटीबीपीमध्ये लेफ्टनंट कमांडंट या पोस्टवर विराजमान झाले होते.
गावाकडे आई-वडील व एक भाऊ असल्यामुळे ते अधून- मधून न चुकता आपल्या आई-वडिलांना भेटीसाठी येत असत. दि. २० रोजी ते आपल्या कर्तव्यावर असताना छत्तीसगड येथील नारायणपूर जव नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या झालेल्या धुमश्चक्रीत त्यांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. यावेळी त्यांचे एक सहकारीही या गोळीबारात शहीद झाले.
काल रात्रीच त्यांचे पार्थिव छत्तीसगड येथील रायपूर येथे आणण्यात आले. आज सकाळी त्यांना आयटीबीपीकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला व त्यानंतर शासकीय वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी बामणी येथे नेण्यासाठी निघाले.
प्रवास लांबचा असल्यामुळे शहीद सुधाकर शिंदे यांचे पार्थिव रात्री उशिराने त्यांच्या बामणी या गावी पोहोचणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानंतर दि.२२ रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी "पुढारी" शी बोलताना दिली.
प्रशासनाकडून शहीद सुधाकर शिंदे यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली असून शहीद सुधाकर शिंदे यांच्या मृत्यूमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : पुणे वाहतूक पोलिसांची सामान्यांवर मुजोरी