बैलगाडी शर्यत : स्टंटबाजी कराल तर गुन्हे दाखल करु; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा | पुढारी

बैलगाडी शर्यत : स्टंटबाजी कराल तर गुन्हे दाखल करु; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बैलगाडी शर्यत सुरु व्हावी यासाठी शिरुरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी लोकसभेत आवाज उठवला आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भरवता येत नाहीत. राज्यात कायदा मोडून जर कोणी स्टंटबाजी करत असेल तर त्यांच्यावर केसेस दाखल होतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

सांगली जिल्ह्यात आमदार गोपिचंद पडळकर यांनी नुकत्याच या शर्यती आयोजित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

बैलगाडी शर्यत सुरु झाल्या पाहिजेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, बैल हा पाळीव प्राणी म्हणून गणला गेला पाहिजे. परंतु तो वनप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. बैलगाडी शर्यत हा आता केंद्राच्या अखत्यारीतील प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभेत यासंबंधी अनेकदा प्रश्न उपस्थित झाला आहे परंतु आता काहीजण स्पर्धा भरवत स्टंटबाजी करत आहेत.

पाठीमागे पाच वर्षे केंद्रात, राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यावेळी त्यांना कोणी अडवले नव्हते. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे.

शर्यती भरवत महाविकास आघाडी यासंबंधी काही करत नाही, असे दाखविण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. परंतु कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असला आणि तो कायदा मोडत असेल तर नियमाने त्याच्यावर केसेस दाखल होतील.

आम्हीही शर्यती घेवू शकतो. परंतु कायदे आम्हीच करायचे आणी ते मोडायचे हे आमच्या रक्तात नसल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार यांचा आवाज काढणाऱ्यावर कारवाई करणार

खासदार शरद पवार यांचा आवाज काढून चुकीची कृत्ये करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल. कायद्याबाहेर कोणी काही करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मग तो कोणत्याही गटाचा, पक्षाचा अथवा गावचा व्यक्ती असो, कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही असे पवार म्हणाले.

राज ठाकरेंना प्रत्यूत्तर…

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असल्याच्या राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर पवार म्हणाले, याप्रश्नी उगाच आता शिळ्या कढीला उत आणू नका. ज्या लोकांना कुठेच थारा मिळत नाहीत ते लोक नको ती स्टेटमेंट करत असतात.

मंदिर उघडण्यासाठी भाजप करत असलेल्या आंदोलनावर पवार यांनी निशाणा साधला. आम्हालाही निर्बध नको आहेत.

परंतु राज्याला ७०० मेट्रीक टनापेक्षा अधिकचा ऑक्सिजन लागणार असेल तर पुन्हा लॉकडाऊन केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

कोरोनाचे सावट कमी व्हावे, तिसरी लाट येवू नये यासाठी काही निर्बंध लावावे लागतात.

वारीच्या कालावधीत वाखरीपासून चालत जाण्यास वारकऱ्यांना परवानगी दिली.

त्यामुळे पंढरपूरात संसर्ग दर वाढला होता, याची आठवण पवार यांनी करून दिली.

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायीच्या अध्यक्षांवर एसीबीने केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकत नाही.

या कारवाईत राजकिय हेतू नाही. सर्वांनी पारदर्शक काम करावे.

पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवडच्या तुलनेत बारामतीतील संसर्ग दर कमी होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत पवार यांनी यासंबंधी प्रशासनाला सक्त ताकीद दिली.

नगरपालिका निवडणुकांचा निर्णय स्थानिक पातळीवर

प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा, पुढे नेण्याची मुभा आहे. आत्ता सध्या तरी महाविकास आघाडी सरकार तीन पक्ष एकत्र येवून चालवत आहेत.

राज्यस्तर व केंद्रस्तराच्या निवडणूकीत काय करायचे हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी घेतात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात काय करायचे याचा अधिकार त्या-त्या जिल्ह्यातील लोकांना देणार आहे.

परंतु एक बैठक आमची उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची बैठक होईल. त्यात निर्णय घेवू.

Back to top button