पाकिस्तानी अँकर म्हणते, सिराजची लाईन-लेंथ लय भारी | पुढारी

पाकिस्तानी अँकर म्हणते, सिराजची लाईन-लेंथ लय भारी

पुढारी ऑनलाईन डेस्क

इंग्लंडमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घालत असलेल्या मोहम्मद सिराजवर एक पाकिस्तानी अँकर फिदा झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशी इंग्लंडचा १२० धावात खुर्दा उडवला आणि ड्रॉकडे चाललेली कसोटी जिंकली. या सामन्यात मोहम्मद सिराजने दोन्ही डावात ८ विकेट घेतल्या.

मोहम्मद सिराजच्या याच भेदक गोलंदाजीवर पाकिस्तानी अँकर झैनाब अब्बास फिदा झाली आहे. स्पोर्ट्स अँकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या झैनाब अब्बासने आपल्या यु ट्यूब चॅनेलवर सिराजच्या गोलंदाजीवर स्तुतीसुमने उधळी. ती म्हणाली की, सिराज सामन्यागणिक आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा करत आहे. माझ्या मते तो जागतिक स्तरावरील अव्वल गोलंदाज आहे.

 म्हणून भारतीय संघ जास्तच धोकादायक

पाकिस्तानी अँकर झैनाब अब्बास म्हणाली की, सिराजने ऑस्ट्रेलियातही दमदार गोलंदाजी केली. आता तो इंग्लंडमध्ये भेदक मारा करत विकेट घेत आहे. सिराजकडे गोलंदाजी करताना कमालीचे नियंत्रण आहे. त्यांची लाईन आणि लेंथ जबरदस्त आहे.

झैनाब अब्बास म्हणाली की, भारताकडे १० वर्षापूर्वी असे दमदार वेगवान गोलंदाज नव्हते. पण, आता भारताकडे जबरदस्त गोलंदाज आहेत. यामुळे भारताचा संघ वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे. भारतीय संघ पूर्वीपेक्षा जास्तच धोकादायक झाला आहे. या संघाकडे परदेशात विजय मिळवण्याची क्षमता आहे. भारताकडे यापूर्वी अशी गोलंदाजांची फळी कधी नव्हती. इशांत शर्मा, बुमराह आणि आता मोहम्मद सिराज ही फळी सर्वच संघांसाठी खूपच धोकादायक आहे.

या तीन गोष्टी सिराजला विशेष बनवतात

पाकिस्तानी अँकर म्हणते की, सिराजकडे ३ विशेष गोष्टी आहेत. यामुळे सिराज इतर गोलंदाजांच्या तुलनेत वेगळा ठरतो. एक म्हणजे तो भरपूर चपळ आहे. दुसरी म्हणजे त्याच्याकडे कमालीचे नियंत्रण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो एका विशिष्ट कोनातून गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचा चेंडून पडून चांगल्या प्रकारे बाहेर जातो.

मोहम्मद सिराज म्हणजे ड्युरासेल बॅटरी

पाकिस्तानी अँकर झैनाब अब्बास बरोबरच इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनदेखील मोहम्मद सिराजचा चाहता झाला आहे. त्याने सिराजची तुलना ड्युरासेल बॅटरीबरोबर केली. सिराज ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी तो आपले शंभर टक्के योगदान देतो.

मोहम्मद सिराजने दुसऱ्या कसोटीत ८ विकेट घेतल्या आहेत.

सिराजने आतापर्यंत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यात २७ विकेट घेतल्या आहेत.

भारत इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.

पहिल्या दोन सामन्यानंतर भारत मालिकेत १ – ० असा आघाडीवर आहे.

मालिकेतील तिसरा सामना २६ ऑगस्ट रोजी हेंडिंग्लेवर होणार आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ : पुण्यातील रविवार पेठेतल्या श्री सोमेश्वर मंदिराचा इतिहास

Back to top button