दिल्लीत दर तीन तासाला कापण्यात आले एक झाड ; 'आरटीआय'मधील माहिती | पुढारी

दिल्लीत दर तीन तासाला कापण्यात आले एक झाड ; 'आरटीआय'मधील माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाची राजधानी दिल्लीत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दर तीन तासाला एक झाड कापण्यात आले आहे, असा खुलासा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत म्हणजे, ‘आरटीआय’ नुसार झाला आहे.पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत अतिशय वेगाने झाडांची कत्तल सुरु आहे.

‘झाडे लावा-झाडे वाचवा’ असा संदेश देशभरात दिला जात असताना खुद्द देशाच्या राजधानीतच विविध प्रकल्पांच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल सुरु असल्याचे आरटीआय’ च्या माहितीमुळे स्पष्ट झाले आहे.

वर्ष २०१६ ते आतापर्यंत म्हणजे, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दिल्लीमध्ये एकूण १५ हजार ९० झाडे कापण्यात आली. दर तीन तासाला एक म्हणजे, दिवसाला ८ झाडे राजधानीत कापण्यात आली.

झाडे कापण्याची परवानगी मागण्यात जसे केंद्र व राज्य सरकार आघाडीवर होते. तसे खासगी लोकही यात पुढे होते. पर्यावरण कार्यकर्ते विक्रांत तोगड यांनी २०१८ साली याबाबतची माहिती मागवली होती, त्याला आता सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे.

मानवालाच्या आरोग्याला फटका

एक झाडामध्‍ये चार लोकांना ऑक्सिजन देण्यासाठी समर्थ असते. झाडे कापण्याच्या बदल्यात नवीन झाडे लावण्यास सांगितले जाते. ही झाडे लावून मोठी होण्यात बरीच वर्षे जातात. त्यामुळे झाडे तोडण्याचा मोठा फटका अखेर मानवालाच्या आरोग्यालाच बसतो, असे विक्रांत तोगड म्‍हणाले.

विशेष म्हणजे, तोगड यांनी मागितलेल्या माहितीनुसार, केवळ वैधपणे कापलेल्या झाडांची माहिती सरकारकडून आलेली आहे.

अवैधपणे तोडलेल्या झाडांची माहिती ना सरकारकडे असते. ना इतर कोणाकडे. पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत अतिशय वेगाने झाडांची कत्तल सुरु आहे.

हेही वाचलं का? 

पाहा : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ

Back to top button