उत्तर प्रदेशात हजारो मतदारांची नावे गायब; मुस्लिम-दलित मते घटवल्याचा भाजपवर आरोप

उत्तर प्रदेशात हजारो मतदारांची नावे गायब; मुस्लिम-दलित मते घटवल्याचा भाजपवर आरोप
Published on
Updated on

लखनौ : हरिओम द्विवेदी,

उत्तर प्रदेशात आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये 113 जागांसाठी मतदान पार पडले आहे. आतापर्यंत मतदारांनी मताधिकाराचा जोरदार वापर केला असला तरी मतदार यादीतून नाव वगळले असल्याने मोठ्या संख्येने मतदारांना निराश होऊन परतावे लागले आहे.

एकट्या साहिबाबादमध्येच 20 हजार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली गेल्याची माहिती आहे. तर मेरठमध्ये 10 ते 12 हजार आणि मथुरेत 15 हजार मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याची चर्चा आहे. एखाद दुसरा जिल्हा नव्हे तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून मतदार यादीतील नावे वगळण्याचा प्रकार समोर आला आहे. यात अशा मतदारांचा समावेश आहे, ज्या मतदारांनी गेल्या अनेक निवडणुकांत मतदान केले आहे, पण यावेळीच त्यांची नावे यादीतून गायब आहेत. विशेष म्हणजे, मतदार यादीतून वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुस्लिम आणि दलित समुदायातील मतदारांची आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांनी हे एक जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

काँग्रेसचे स्टेट मीडिया प्रभारी अभिमन्यू त्यागी म्हणाले, मेरठमध्ये मुस्लिमबहुल भागातील मतदार यादीची रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा छाननी केली आहे. त्यामुळे अनेकांची नावे वगळली गेली आहेत. राजकीय पक्षांच्या नजरेतून ही बाब निसटली आहे.मथुरेतील सपाचे जिल्हाध्यक्ष ठाकुर लोकमणिकांत जादौन म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मिळून 15 हजार नावे मतदारयादीतून वगळली गेली आहेत. यात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. केवळ मेरठमध्येच 10 ते 12 हजार मते वगळली गेली आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.आयोगाने मतदारांना त्यांचे नाव यादीत पाहण्याची सुविधा दिली आहे. यादीत नाव नसल्यास समाविष्टही करता येईल. मतदारसंघही अद्ययावत करण्याची सुविधा आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याची माहिती आहे. तरीही मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळली गेल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच मतदारांनी आणि राजकीय पक्षांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

सर्वच पक्षांचे नुकसा : भाजप

भाजपचे बूथ मॅनेजमेंट पाहत असलेले वीरेंद्र शर्मा म्हणाले की, मेरठच्या शास्त्रीनगर भागात 100 पोलिंग बूथ आहेत. येथे मतदार संख्या एक लाख आहे. त्यातील 10 हजार नावे वगळली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचे नुकसान झाले आहे. पण, एखाद्या समुदायातील मते वगळल्याचे सांगणे चुकीचे आहे.

काहीही करू देत, भाजपचा पराभव निश्‍चित : सपा

समाजवादी पक्षाचे प्रवक्‍ता आशुतोष वर्मा म्हणाले की, गत पंचायत निवडणुकीतही भाजपने मशिनरीचा दुरुपयोग केेला होता. या निवडणुकीतही ते असे करू शकतात, पण त्याने काहीही होणार नाही. आता भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा पराभव निश्‍चित आहे. मतदारांची नावे वगळल्याने त्यात काही फरक पडणार नाही.

निवडणूक आयोग म्हणतो…

निवडणूक आयोगाच्या मते, यूपीत एकूण 15 कोटी 20 लाख मतदार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानात 2 कोटी 27 लाख मतदार होते. यातील 60.17 टक्के म्हणजेच जवळपास 1 कोटी 37 लाख मतदारांनी मताधिकार बजावला. दुसर्‍या टप्प्यात एकूण 2 कोटी 2 लाख मतदारांपैकी 64.42 टक्के म्हणजे जवळपास 1 कोटी 30 लाख मतदारांनी मताधिकार बजावला. मतदारांची नावे वगळली गेली नसती तर मतदानाची टक्केवारी आणखी वाढलेली दिसली असती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news