पुनर्रचनेवर ठरणार राजकीय समीकरणे | पुढारी

पुनर्रचनेवर ठरणार राजकीय समीकरणे

कराड : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगास सादर झाला आहे. कराड तालुक्यात आता 12 ऐवजी 14 जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे 24 ऐवजी 28 गण होणार आहेत. त्यामुळेच सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळेच इच्छुकांसह तालुक्यातील प्रस्थापितांच्या नजरा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेकडे लागून राहिल्या आहेत.

कराड तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. सध्यस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषदेचे 12 गट आहेत. तर पंचायत समितीचे 24 गण आहेत. सध्यस्थितीत या प्रत्येक जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या 44 ते 45 हजारांच्या घरात आहे. मात्र आता 34 हजार लोकसंख्या गृहीत धरून जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना होणार आहे.
तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गटापैकी निम्म्या गटांवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर उर्वरित सहा पैकी प्रत्येकी तीन जिल्हा परिषद गटांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे वर्चस्व आहे. पुनर्रचनेनंतर 2 जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे 4 गण वाढणार आहेत. त्यामुळेच कराड पंचायत समितीमधील बहुमताचा आकडा किमान 15 होणार आहे.

पुनर्रचनेत जिल्हा परिषद गटांची लोकसंख्या जवळपास 10 हजारांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गटातील सध्याची गावे कमी होणार असून काही नवीन गावांचा समावेश होणार आहे. त्यामुळेच सध्यस्थितीत असणारी जिल्हा परिषद गटातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. उदाहरण घ्यायचे असेल तर रेठरे बुद्रूकसारख्या गटात शेणोली, आटके, रेठरे खुर्द यासारखी मोठी गावे आहेत. मात्र आता या गटातील एक ते दोन गावे बदलणार आहेत. रेठरे बुद्रूक या गावातील राजकीय परिस्थिती पाहता या गावातील राजकीय समीकरणे फारशी बदलणार नाहीत. मात्र रेठरे बुद्रूकमधील समीकरणांचा आटके आणि शेणोली या गावातील उमेदवारांना फायदा होत होता. पुनर्ररचनेनंतर ही गावे कोणत्या नवीन जिल्हा परिषद गटात समाविष्ट असणार ? याबाबत उत्सुकता असणार आहे.

येळगाव, काले, वडगाव हवेली – कार्वे, विंग – कोळे या जिल्हा परिषद गटातही अशाच प्रकारे मोठे फेरबदल होणार आहेत. त्याचबरोबर तालुक्यात कोणते दोन नवीन जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार ? याबाबतही उत्सुकता आहे.
कराड दक्षिणमधील उंडाळे अथवा कोळे – विंग विभागात जिल्हा परिषद गट वाढल्यास त्याचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. तर कृष्णाकाठी रेठरे बुद्रूक, वडगाव हवेली विभागात जिल्हा परिषद गट वाढल्यास त्याचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते पुनर्रचनेकडे डोळे लावून बसल्याचे पहावयास मिळत आहे.

त्याचवेळी कराड उत्तरमध्ये मागील निवडणुकीत कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला होता. 2012 साली पंचायत समितीच्या 9 जागांवर विजय मिळवणार्‍या राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले होते. हजारमाची आणि वाघेरी या पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळेच पराभवाचा वचपा काढत सर्व जागांवर विजय मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कराड उत्तरमध्ये जिल्हा परिषद गट वाढल्यास त्यास अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुनर्रचनेनंतर कोणत्या पक्षाला फायदा होणार ? आपले गाव कोणत्या जिल्हा परिषद गटात समाविष्ट असणार ? याबाबत तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी कोणाची मदत घेणार ? 

एकट्या कराड उत्तरमधील पंचायत समिती गणांच्या जोरावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला कराड पंचायत समितीत बहुमत मिळू शकत नाही. पंचायत समितीच्या सर्व चारही जागा कराड उत्तरेतच वाढल्या असे गृहीत धरल्या तरी बहुमतासाठी एक ते दोन जागा राष्ट्रवादीला कमी पडतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच पुन्हा सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची मदत घेणार ? याबाबतही कार्यकर्ते तर्कविर्तक लढवताना दिसत आहेत.

हेही पाहा

Back to top button