चंद्रपुरात १६ वर्षीय मुलाला बिबट्याने फरफटत नेलं, २४ तासांतील दुसरी घटना | पुढारी

चंद्रपुरात १६ वर्षीय मुलाला बिबट्याने फरफटत नेलं, २४ तासांतील दुसरी घटना

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा 

महाऔष्णिक वीज केंद्रातून काम आटोपून घरी परतणाऱ्या (52 वर्षीय) कामगाराला बुधवारी रात्रीच्या सुमारास वाघाने फरफटत नेऊन ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दुसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास दुर्गापूर येथील (16 वर्षीय) मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. काल (गुरूवार) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराशेजारी हा मुलगा निघाला असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला फरपटत नेल्याची माहिती पुढे आली आहे. राज भडके असे मृताचे नाव असून तो दुर्गापूर नेरी येथील रहिवासी आहे. या घटनेने दुर्गापूर परिसरात प्रचंड दहशत माजली आहे. अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही.

दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागील नेरी परिसरातून राज जात होता. यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले आहे. आज (शुक्रवार) सकाळ पर्यंत मुलाचा शोध लागलेला नव्हता. वनविभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
बुधवारच्या रात्री (52 वर्षीय) भोजराज मेश्राम हा कामगार महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी परत येत असताना आडमार्गात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्‍यांनाही वाघाने जंगलाच्या दिशेने फरफटत नेले होते. त्यानंतर काल (गुरुवार) त्यांचा मृतदेह आढळून आला.

ही घटना ताजी असतानाच काल (गुरुवार) रात्रीच्या सुमारास पुन्हा एका सोळा वर्षीय राजला बिबट्याने जंगलाच्या दिशेने फरफटत नेल्‍याची दुसरी घटना घडली आहे. दुर्गापूर ऊर्जानगर परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांकडून वनविभाच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.

वनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर यांचे आमरण उपोषण सुरू 

चंद्रपूर शहराला लागून असलेले महाऔष्णिक वीज केंद्र, दुर्गापूर, ऊर्जानगर व लगतच्या गाव परिसरात पट्टेदार वाघ व बिबट्याचे वास्तव्य अनेक वर्षांपासून आढळून येत आहे. वारंवार वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत असतानाही वन विभागाने या मागणीला आजपर्यंत ठेंगा दाखविलेला आहे. त्यामुळेच आसपासच्या परिसरातील अनेक गावातील नागरिकांना वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात प्राणाला मुकावे लागले आहे. या मागणीला घेऊनच काल पासून वनविभागाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात वनविभाग पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप भटारकर यांनी केला आहे आहे. बुधवारी 52 वर्षीय गोदरेज मेश्राम हा कामगार वीज केंद्रातून घरी परत येत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना ताजी असतानाच काल (गुरुवार) सोळा वर्षीय राजला बिबट्याने उचलून नेले. त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला असून, नितीन भटकर यांच्या आंदोलनाला नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. वन विभाग या भागांचा बंदोबस्त जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार भटारकर आणि नागरिकांनी केला आहे.

Back to top button