पंतप्रधान मोदींना पोस्टाने निवेदन, मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्याचे साकडे | पुढारी

पंतप्रधान मोदींना पोस्टाने निवेदन, मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्याचे साकडे

लासलगाव : वार्ताहर : नाशिक जिल्ह्याची महत्वाची रेल्वे गाडी असलेली मनमाड – लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरू करावी या मागणीचे निवेदन चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र हांडगे यांनी पोस्टाद्वारे पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव ही आशिया खंडातील मोठी कांदा बाजारपेठ आहे. तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी, नोकरदार व विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नाशिक येथे जाण्या-येण्यासाठी गोदावरी एक्सप्रेस गाडी चा उपयोग होत होता. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे लोकमान्य टिळक गाडी बंद करण्यात आलेली आहे.

मनमाड, लासलगाव, निफाड, व नाशिक येथील नागरिकांनी वेळोवेळी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा ना डॉ. भारती पवार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच रेल्वे अधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन सुद्धा प्रवाश्यांना फक्त आश्‍वासन मिळाले आहे. मनमाड – लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी अद्याप पर्यंत सुरू न केल्याने सामान्य नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे संप सुद्धा गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड होत आहे व जाण्यायेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे विचार करून व सविस्तर माहिती घेऊन मनमाड – लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांना देऊन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती महेंद्र हांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button