सातारा : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिकांचा कार्यकाल नुकताच संपला आहे. मुदत संपुष्टात आल्याने आणि नवी पार्लमेंटरी बॉडी अस्तित्वात न आल्याने या सहा नगरपालिकांच्या प्रशासकपदी त्या-त्या नगरपालिका मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाचगणी पालिकेचा कार्यकाल दि. 30 रोजी मुदत संपत आहे. दरम्यान, प्रशासकीय राजवट लागल्यामुळे सातारा पालिकेत पदाधिकार्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली असून पदाधिकार्यांच्या केबिनचा वापर बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू आहे. खंडाळा, लोणंद, मेढा, कोरेगाव, वडूज, दहिवडी आणि पाटण या नगरपंचायतींसाठी मतदान झाले. ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर 24 जागांसाठी दि. 18 जानेवारी रोजी मतदान होत आहे.
19 जानेवारीला मतमोजणी असल्याने जिल्ह्यातील निमशहरी भागातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा कार्यकाल दि. 26 रोजी संपुष्टात आला असून दोन पालिकांचा कार्यकाल 30 रोजी संपत आहे.
'अ' वर्ग असलेली सातारा नगरपालिका, 'ब' वर्ग असलेली फलटण व कराड नगरपलिका आणि 'क' वर्ग असलेली वाई, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिकांवर नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी यासंदर्भातील आदेश दिले. नगरपालिकेतील विभागप्रमुखांना सोबत घेऊन प्रशासक यापुढील कामकाज पाहणार आहेत. पदाधिकार्यांना या कालावधीत प्रशासनावर कुठल्याही कामासाठी दबाव टाकता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केला आणि त्याची तक्रार संबंधित अधिकारी, कर्मचार्याने केल्यास त्याचा परिणाम संबंधित नगसेवकाच्या राजकीय अडचणी वाढवणारा ठरु शकतो. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकार्यांना यापुढे प्रशासनाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. राज्यात एकमेव सातारा जिल्ह्यातच सहा नगरपालिकांसाठी मुख्याधिकार्यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मुख्याधिकार्यांसोबत प्रांताधिकारी, तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरपालिकांचा कार्यकाल संपुष्टात येत असल्यामुळे पदाधिकार्यांची वाहने ताब्यात घेवून त्यांची दालने सील करावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती. त्यानुसार प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर सातारा पालिकेत पदाधिकार्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. सर्व पदाधिकार्यांना केबिनवापर बंद करण्यात आला आहे. इतर नगरपालिकांमध्येही यापध्दतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना संसर्ग संक्रमण वाढल्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडणे शक्य नाही. मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने प्रशासक नियुक्तीचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानेही जिल्ह्यातील त्या-त्या नगरपालिकांसाठी 8 मुख्याधिकार्यांच्या प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
महाबळेश्वर तसेच पाचगणी नगरपालिकेचा कार्यकाल दि. 30 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याही ठिकाणी प्रशासक येणार आहे. मुदत संपणार्या सर्व आठ नगरपालिकांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा नगरपालिकेची सूत्रे जिल्हा प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे राहणार आहेत. कराड नगरपालिकेत रमाकांत डाके, फलटण नगरपालिकेत संजय गायकवाड, वाई नगरपालिकेत किरणकुमार मोरे, रहिमतपूर नगरपालिकेत संजीवनी दळवी, म्हसवड नगरपालिकेत डॉ. सचिन माने, महाबळेश्वर नगरपालिकेत पल्लवी पाटील, पाचगणी नगरपालिकेत गिरीष दापकेकर हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.