सातारा; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या सवयीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा हात कुणीच धरु शकत नाही. हाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या बाळासाहेब सोळस्कर यांनाही आला. 'साहेब, माझ्या घरी तुम्ही परत आलंच पाहिजे', असा पवारांचा पिच्छा पुरवणार्या बाळासाहेबांचा हट्ट पवारांनाही मोडता आला नाही. सोळशी येथे जावून पवारांनी सोळस्करांचा पाहुणचार घेतलाच.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्यात शरद पवार यांचा मोठा हातखंडा. राजकारणाची सुरुवात पवारांनी केली तेव्हापासून ज्यांनी ज्यांनी पवारांना साथ दिली त्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी पवारांची नाळ जुळलेली. कार्यकर्त्याच्या घरी जावून कुटुंबाशी समरस होण्याच्या स्वभावामुळे शरद पवार जमिनीवर जेवढे दिसतात त्यापेक्षा कितीतरी खोल त्यांच्या जनसंपर्काची मुळे रुजलेली आहेत. सातारा जिल्ह्यावर शरद पवारांचा असलेला वरचष्मा हा त्यांच्या ग्रामीण भागाशी जुळलेल्या नाळेमुळे आहे. कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे तर शरद पवार यांचे मूळ गाव. या नांदवळला लागून असलेल्या सोळशीचे बाळासाहेब सोळस्कर-पाटील हे पवारांचे गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत विश्वासू सहकारी. आमदार – खासदारांच्या पलिकडे जावून पवारांची सातारा जिल्ह्यात जी काही थेट व खास माणसे आहेत त्यात सोळस्करांचे नाव येते.
त्यामुळेच बाळासाहेबही सातारा जिल्ह्याच्या राजकीय बैठकीत 'लेट हाय पण थेट हाय' असे डायलॉग सहजपणे बोलत असतात. याच बाळासाहेबांना पवारांनी थेट मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदावर बसवले होते. पश्चिम महाराष्ट्रात दुसर्यांदा संचालक पदावरही संधी मिळणारे बाळासाहेब सोळस्कर हे एकमेव आहेत तेही केवळ पवारांमुळेच.
पवारांचा व सोळस्करांचा हा गुरुशिष्याचा हा वारंगुळा कित्येक वर्षे सुरु आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा शरद पवार सोळशीला बाळासाहेबांच्या घरी येवून गेले असताना पुन्हा एकदा बाळासाहेबांनी त्यांना घरी येण्याचा हट्ट धरला. तेव्हा सोळस्करांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित न राहू शकलेले खा. शरद पवार कोरेगाव तालुक्याच्या दौर्यावर असताना आवर्जून सोळस्करांच्या घरी भेट द्यायला गेलेच. सोबत विजय कोलते होते. खा. शरद पवार यांना पुन्हा एकदा वाड्यात पाहून सोळस्कर कमालीचे भावुक झाले. खा. शरद पवार ही या भेटीने भारावून गेले. 'विजयराव आलो नसतो तर बाळासाहेब रुसले असते, मोठा हट्टी माणूस आहे हा' अशा शब्दात खा. शरद पवार यांनी सोळस्करांमधील कार्यकर्त्याला प्रशस्तीपत्रक दिले.
दत्तात्रय सोळस्कर व धनंजय सोळस्कर यांनी खा. शरद पवार यांना पाटलांच्या वाड्यातला फेटा बांधून त्यांचे स्वागत केले. तर जीवन सोळस्कर, सौ. स्नेहल सोळस्कर, आकाश सोळस्कर, सौ. कल्याणी सोळस्कर यांना पवारांनी शुभेच्छा दिल्या. सोळशीतील ग्रामीण जनतेने गुरु-शिष्यांमधील हा जिव्हाळा कौतुकाने पाहिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन चेअरमन नितीन काका पाटील हेही या भेटीने सुखावून गेले. जाता जाता पवारांनी बाळासाहेबांच्या खांद्यावर हात टाकून 'बाळासाहेब खुश ना', असे उद्गार काढले. तेव्हा सोळस्करांच्या डोळ्यातून अश्रू आले. साहेब, मी खूप भाग्यवान आहे, असे म्हणत सोळस्कारांनी पवारांचे आभार मानले.
हेही वाचलत का?