पुणे : सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी पेटणार संघर्ष

Political Cartoon
Political Cartoon

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये राजकीय संघर्ष होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता असून, अनेक प्रभागांत तीनपेक्षा जास्त विद्यमान नगरसेवक एकत्र आल्याने त्यामधील अनेकांना थेट निवडणूक न लढताच घरी बसावे लागेल, अशी भीती आहे. आरक्षण सोडतीनंतरच यासंबंधीचे चित्र अधिक स्पष्ट होऊ
शकणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागांची प्रारूप प्रभागरचना मंगळवारी प्रशासनाने जाहीर केली. या नव्या प्रभागरचनेने पालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या प्रभागरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान प्रभागरचनेत उभ्या-आडव्या पद्धतीची मोडतोड झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांची फरफट होणार आहे.

मध्यवस्तीत भाजपला डोकेदुखी

मध्यवस्तीत शनिवार पेठ थेट राजेंद्रनगरपर्यंत जोडली गेल्याने भाजपमधील अनेक इच्छुक एकाच प्रभागात अडकले गेले आहेत. विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, नगरसेवक राजेश येनपुरे हे एकाच प्रभागात एकत्र आले आहेत. याशिवाय या ठिकाणी स्वरदा बापट, बापू मानकर, आमदार टिळक यांचे चिरंजीव अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

आैंध बालेवाडीत विद्यमनांना अडचण

लगतच्या औंध-बालेवाडी प्रभागातही नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे या तीन विद्यमानांबरोबरच माजी नगरसेवक सनी निम्हण, दत्ता गायकवाड असे प्रमुख इच्छुक एकाच ठिकाणी येणार आहेत. पर्वती मतदारसंघातील गंगाधाम-सॅलिसबरी पार्क या प्रभागात माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका कविता वैरागे, मानसी देशपांडे, अनसूया चव्हाण, राजेंद्र शिळीमकर हे विद्यमान एकत्र आले आहेत. त्यामुळे नक्की कोणाचा पत्ता कट होणार, असाही प्रश्नही उपस्थित झाला आहे.

कोथरुडमध्ये महाविकास आघाडीतील संघर्ष टळला

कोथरूडमध्ये नगरसेवक दीपक मानकर, चंदूशेठ कदम, सेनेचे पृथ्वीराज सुतार यांच्या रचना स्वतंत्र झाल्याने महाविकास आघाडीतील संघर्ष टळला आहे, तर समाविष्ट सूस, पाषाणसह बाणेरचा दोन सदस्यांचा प्रभाग झाल्याने राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे सुरक्षित झोनमध्ये गेले आहेत. सिंहगड रस्त्यावर प्रभाग क्र. 52 मध्ये नांदेड सिटी-सन सिटी या प्रभागात विद्यमान नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे हे विद्यमान एकत्र आल्याने येथेही उमेदवारीचा पेच उभा राहणार आहे. वडगाव शेरी मतदारसंघात आमदारांनी त्यांच्या बंधूचे प्रभाग सुरक्षित केल्याचे चित्र असले, तरी अनेक विद्यमान नव्या रचनेने अडचणीत आल्याचे चित्र आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये नगरसेविका सुनीता गलांडे, शीतल शिंदे, श्वेता खोसे-गलांडे, संदीप जराड एकत्र आले आहेत. तर, प्रभाग क्र. 7 मध्ये नगरसेवक योगेश मुळीक, बापूराव कर्णे गुरुजी आणि सिद्धार्थ धेंडे एकत्र आले आहेत. त्यामुळे येथेही भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

बापू पठारेंची डोकेदुखी वाढली

माजी आमदार बापू पठारे यांचे वर्चस्व असलेल्या खराडीचा परिसर वाघोलीला जोडला गेला आहे. त्यामुळेही त्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर विमाननगर आणि लोहगाव एकत्र आल्याने विमाननगरमधील विद्यमान इच्छुकांचीही डोकेदुखी वाढली आहे. कोरेगाव पार्क, घोरपडी थेट मुंढव्यापर्यंत प्रभाग झाल्याने राष्ट्रवादीचे बंडू गायकवाड आणि भाजपचे उमेश गायकवाड हे काका पुतणे एकाच प्रभागात आमने-सामने येणार की पुतण्यासाठी काका अन्य प्रभागात जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हडपसरमध्ये आमदार चेतन तुपे यांच्या इच्छुक चिरंजीवांचा प्रभाग अनुकूल झाला आहे. मात्र, माजी आमदार योगेश टिळेकर यांचा बालेकिल्ला ओळखला जाणारा कोंढवा खुर्द प्रभागाची मोडतोड झाली असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नव्या प्रभाग रचनेत महापौर मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग क्र. 33 भुसारी कॉलनी – महात्मा सोसायटी हा प्रभाग थेट पौड फाटा ते थेट भूगावपर्यंत असा तब्बल 29 चौरस किमीचा झाला आहे. त्यामुळे महापौरांना स्वत:च्या प्रभागातच अडकून पडावे लागणार आहे. या प्रभागात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे.

दिग्गजांना प्रभाग अनुकूल

महापालिकेतील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकार्‍यांचे प्रभाग अनुकूल झाले आहेत. विशेष म्हणजे एकमेकांच्या शेजारी असून एकमेकांना अडचण होणार नाही, अशा पद्धतीच्या रचना या पदाधिकार्‍यांच्या झाल्या आहेत. त्यामध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे, रवींद्र धंगेकर, सुभाष जगताप, दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार आदींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news