mumbai night curfew : मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली | पुढारी

mumbai night curfew : मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यामुळे सकाळची जमाव बंदी व रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे. शहरातील उद्याने, मैदाने, चौपाट्या, राष्ट्रीय उद्यान आदींवरील निर्बंध शिथील केले आहेत. याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिकेने रात्री प्रसिद्ध केले. त्यामुळे मुंबईकरांना आता मुक्त फिरता येणार आहे. (Mumbai night curfew)

मुंबई कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत जात, २० हजारावर पोहचल्यामुळे शहरात पालिकेने ८ जानेवारीला परिपत्रक काढून विविध निर्बंध लागू केले. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने सोमवारी अनेक निर्बंध शिथील केले आहेत . त्यामुळे पालिकेनेही मुंबई निर्बंध शिथील करुन मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

शहरातील उद्याने, मैदाने खुली करण्यासह मनोरंजन पार्क, थीम पार्क ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासह, जलतरण तलाव, वॉटर पार्कसाठी ५० टक्क्यांच्या क्षमतेची अट आहे. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे नियमित वेळेनुसार ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईतील रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची संचारबंदी हटविण्यात आली आहे. त्यासह चौपाट्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. लग्न समारंभासाठी मोकळ्या मैदानांमध्ये २५ टक्के क्षमतेने आणि सभागृहात २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

mumbai night curfew : आठवडी बाजार नियमित वेळेनुसार सुरू

आठवडी बाजार नियमित वेळेनुसार सुरू राहणार असून भजनांसह अन्य स्थानिक सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम सभागृह किंवा मंडपांमध्ये ५० टक्क्यांच्या क्षमतेने व खेळ, घोड्यांच्या शर्यतींसह अन्य कार्यक्रम २५ टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहतील. याबाबतचे परिपत्रक पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मंगळवारी जारी केले.

Back to top button