Ratnagiri Crime : अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी पोलिसांच्या अंगावर घातली संशयिताने गाडी | पुढारी

Ratnagiri Crime : अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी पोलिसांच्या अंगावर घातली संशयिताने गाडी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या अंगावर संशयिताने गाडी घातली. दरम्यान, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतोष जगदाळे (रा. सासवड, पुणे) याला शिताफीने अटक करण्यात आले. हल्ला केल्यानंतर १३० किलोमीटर पाठलाग करून थरारक पद्धतीने शहर पोलिसांच्या पथकाने संतोष जगदाळेला ताब्यात घेतले. (Ratnagiri Crime)

गेली वर्षभर तो पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्थानकात ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न करण्यासह शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरवळ (सातारा) पोलिसांनी दिली.

Ratnagiri Crime : गाडीच्या कर्जासाठी लाखो रुपये घेतले

रत्नागिरी शहरातील प्रियंक साळवी यांनी दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष जगदाळे याने ओळखीचा फायदा घेत गाडीचे कर्ज फेडण्यासाठी सुमारे ७ लाख रुपये रक्कम घेतले होते. काही दिवसात ती रक्कम परत करतो असे त्यांनी सांगितले होते. परंतु वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही पैसे परत न दिल्याने प्रियंका साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी संतोष विश्वनाथ जगदाळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु तेव्हापासून संतोष जगदाळे हा गायब झाला होता. संतोष जगदाळे यांच्या शोधासाठी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी महाडिक, कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. (दि.३० जानेवारी) रोजी पोलिसांचे पथक संतोषला पकडण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे गेले होते.

तब्बल १३० किमीचा प्रवास

रत्नागिरी शहर पोलिसांच्या खास खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सासरवाडीला जाण्याच्या तयारीत असतानाच तो शिंदेवाडी फाटा ते भोरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी एक वाहनामध्ये संतोष असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोषच्या गाडीकडे जात असताना, संतोषने पोलिस असल्याची खात्री झाल्यावर गाडी मागे घेऊन पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून पोलिस सुदैवाने बचावले.

पोलिस सुदैवाने बचावले

संतोषने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. तो तेथून पहाटे पावणे तीनच्या सुमारास पुन्हा गाडीतून पळाला. तब्बल १३० किलोमीटर पाठलाग केल्यानंतर (दि.३१) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास संतोषच्या गाडीचे टायर फुटल्याने तो थांबला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

संतोष विरोधात शिरवळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर शिरवळ पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदलवार करत आहेत.

Back to top button