Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त; तब्बल 7000 पोलीस तैनात

police 1
police 1
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटना विचारात घेऊन पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. तर शंभर फिक्स पॉइंटद्वारे 24 तास पहारा दिला जाणार आहे. गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई, पायी पेट्रोलिंगवर भर दिला जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

दरम्यान, शुक्रवारी (दि. 15) झालेल्या आठवडा बैठकीत पोलिस आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आढावा घेऊन अधिकार्‍यांना सूचना दिल्या. या वेळी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस, पोलिस उपायुक्त आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी (दि. 19) होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागांतून नागरिक दर्शनासाठी येतात. परदेशी नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागाात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांकडील मोबाईल चोरी, दागिने चोरी तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.

पोलिस आयुक्तालयातील पाच हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी, शीघ— कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले एक हजार 300 पोलिस कर्मचारी, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, एसआरपीएफच्या पाच तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलिस मित्र साहाय्य करणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलिस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत.

1800 सीसीटीव्हीची नजर

उत्सवातील गर्दीवर शहरातील 1800 सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून अटक केली. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

प्रवेशद्वारावर तपासणी नाके

शहरात शंभर फिक्स पॉइंटची आखणी करण्यात आली आहे. त्याद्वारे चोवीस तास पोलिस पहारा देणार आहेत. प्रत्येक पॉइंटवर दिवसा दोन आणि रात्री दोन असे चार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्यावर इतर प्रभावी अधिकार्‍यांचे नियंत्रण असणार आहे. शहराच्या वेशीवर आणि प्रवेशद्वारावर तपासणी नाके उभारण्यात येणार असून, प्रवेश करणार्‍या वाहनांची तेथे तपासणी केली जाणार आहे.

असे आहेत फिक्स पॉइंट

  •  परिमंडळ एक : 26
  • परिमंडळ दोन : 21
  • परिमंडळ तीन : 09
  • परिमंडळ चार : 22
  • परिमंडळ पाच : 22

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news