

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठी साहित्य संमेलनात एक नवा पायंडा रचणार्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. ही प्रत्येकासाठी आनंदाची व अभिमानाची गोष्टी आहे. 2016 साली संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी डॉ. पी. डी. पाटील यांच्यावर आली. ही जबाबदारी घेऊन त्यांनी साहित्य मंथन सुरू केले. या साहित्य मंथनातून ही रत्ने वर आली. त्यातून जे प्रसिद्ध झाले ते साहित्य संचित हा अमृत कुंभ आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी काढले.
डॉ. डी. वाय. विद्यापीठ आयोजित डॉ. पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-पिंपरी-चिंचवड 2016 आणि 18 वे जागतिक मराठी संमेलन 2023) यांच्या संकल्पनेतून 89 व्या मराठी साहित्य संमेलन तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित 'साहित्य संचित आणि शोध मराठी मनाचा' 2023 या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी (दि.15) रोजी ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठकार दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात पार पडला.
पिंपरी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे या दोन्ही महत्वपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्याच पुढाकाराने हे अमूल्य ग्रंथ प्रकाशित झाले आहे. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील , संचालिका व विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास
फुटाणे व माजी कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप, अमळनेर येथे होणार्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते साहित्य संचित ग्रंथांच्या प्रकाशनाबरोबरच ई-बुक व संमेलनाच्या यू-ट्यूब चॅनल्सचे लोकार्पणदेखील करण्यात आले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, पिंपरीतील संमेलन काल परवा झाल्यासारखे वाटते आहे. आम्ही अजूनही त्याच आनंदात आहोत. विचाराने पुरोगामीत्व स्वीकारून केलेले काम कौतुकास्पद आहे. साहित्य संमेलन हे ऐतिहासिक संमेलन झाले हे याआधी कधी झाले नाही आणि पुढे कधी होईल, असे मला वाटत नाही. डॉ. पी. डी. पाटील यांना साहित्य संमेलनाचे एक योगदान समाजाला द्यावे असे वाटले आणि त्यांनी त्या भावनेने हे केले. एवढा प्रचंड खर्च करणे एखाद्या राजालाच जमेल आणि डॉ. पी. डी. पाटील हे लोकशाहीचे राजे आहेत.
रामदास फुटाणे म्हणाले की, पुस्तक प्रकाशन आणि चॅनेलच्या माध्यमातून कायम जिवंत राहणार आहे. पिंपरीत झालेले संमेलन इतके भव्य झाले आहे की, येत्या काळात संमेलन घेताना दडपण येणार आहे. डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलन मोठ्या उंचीवर नेले. हल्ली तरुणांना नोकर्या नाहीत. त्यामुळे वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जन्माला येऊ लागले आहे ही स्थिती पाहायला मिळतेय. खरे तर मराठी साहित्य संमेलनामुळे तरुणांना दिशा मिळते.
अॅड. रमाकांत खलप म्हणाले की, कोकणी मराठी यांचे संयुक्त साहित्य संमेलन व्हावे. तसेच या संमेलनात विविध बोलिभाषांना यात स्थान मिळावे. डॉ. पी.डी.पाटील म्हणाले की, आज मला अतिशय आनंद होत आहे. 89 व्या साहित्य संमेलन जेव्हा घेतले तेव्हा ते इतके सुंदर होईल असे वाटले नव्हते. ते साहित्य संमेलन इतके यशस्वी झाले.
त्या वेळी माझ्या मनात सतत विचार सुरू झाला की हे ग्रंथरूपी अक्षयधन लोकांपुढे सादर करावे. बरेचसे लोक मला संमेलनाबद्दल विचारायचे. त्यामुळे आम्ही ठरविले की, हे संमेलन ई – बुक आणि यू ट्युबव्दारे समाजासमोर आणावे. यासाठी बराच कालावधी लागला. पण खरोखर समाजाला दिशा देण्यासाठी एक उत्तम साधन आहे. हा लोकांच्या दृष्टीने अमोल ठेवा आहे. प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वर्षा तोडमल यांनी केले.
लेखक हा मुळातच लढवय्या असतो. योग्य त्या वेळी लेखकाने समाजहितासाठी आक्रमक भूमिका मांडण्याची आवश्यकता असते. समाजस्थिती पाहून मूग गिळून गप्प बसणारे आणि मौन बाळगणारे लेखक समाजस्वास्थ्याला घातक असतात असे परखड वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.
हेही वाचा