

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; अंगावर कांबळ टाकून व्याधी बरी करण्याचा दावा करणार्या कंबलवाला बाबाने चार दिवस घाटकोपरमध्ये हजारो रुग्णांवर अघोरी पद्धतीने उपचार केल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी या बाबाला खास राजस्थानहून पाचारण करत ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत आपल्या मतदारांवर त्याच्याकरवी उपचार करवून घेतले. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. (Kambal Wale Baba News)
संबंधित बातम्या
हा बाबा अंगावर शहारे येतील अशा रितीने रुग्णांवर उपचार करत असल्याचे चित्रफितीवरून पुढे आले आहे. कंबलवाला बाबा रुग्णाच्या अंगावर कांबळ टाकून त्यांच्या नाड्या तपासून त्याला कोणता आजार आहे हे सांगतो आणि त्यावर उपचारही करतो. लकवा, आखडलेले खांदे अशा आजारांचा इलाज त्यांनी केल्याचे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते.
हा बाबा प्रसंगी रुग्णांचे हातपाय वाटेल त्या पद्धतीने दुमडून उपचार करतो. एखादा रुग्ण कर्णबधिर असेल तर तो अत्यंत निर्दयपणे त्याच्या कानशिलात लगावतो. प्रसंगी त्याच्या डोक्यावर जोरदारपणे टपली मारतो. यातून महिलाही सुटत नाहीत. विकलांग व्यक्तींना बरे केल्याचा दावा हा बाबा करतो.
यासंदर्भात आमदार राम कदम यांनी सांगितले की, मी माझ्या आई-वडिलांना आणि मित्रांना घेऊन या कंबलवाल्या बाबाच्या कॅम्पला गेलो होतो. या बाबांना शरीरातील नसांची अत्यंत चांगली माहिती आहे. त्याआधारे ते उपचार करत असल्यामुळे रुग्णांना आराम पडतो. हे बाबा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाहीत. याची खात्री मी स्वतः
केली आणि त्यानंतर माझ्या मतदारसंघात त्यांचे शिबिर लावले.
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंनिस सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे. तसेच महिलांसोबत निंदनीय कृत्य करणारा बाबा आणि अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करणारे घाटकोपरमधील भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात सरकारने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. (Kambal Wale Baba News)
हे ही वाचा :