जेजुरी : खंडेरायाचे मंदिर भक्तांसाठी खुले

जेजुरी : खंडेरायाचे मंदिर भक्तांसाठी खुले

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाचे मंदिर आज (गुरुवार) पहाटे भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आज कोरानाचे सर्व नियम पाळून शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार सर्व भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक पूजा करून आज खंडोबा देवाला कोरोना कायमचा देशातून, महाराष्ट्रातून हद्दपार होउ दे अशी खंडेरायाला प्रार्थना केली.

यावेळी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विना सोनवणे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पंकज निकुडे, खंडोबा देवाचे पुजारी माधव बारभाई, आशिष बारभाई, विलास बारभाई, ओमकाका बारभाई, अविनाश सातभाई, मिलिंद सातभाई, सुभम सातभाई, सनई चौघडा साठी सार्थक मोरे, सिध्दार्थ मोरे, खंडोबा देवाचे नित्य वारकरी जालीदंर खोमणे, सोमनाथ उबाळे, बाळासाहेब थोरात, मधुभाऊ खोमणे, जयजीत खोमणे, महेश उबाळे, अविनाश राऊत, क्रृष्णा शेद्रे आदी भाविक उपस्थित होते.

पहाटेपासूनच भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांना सॅनिटायझर करूनच गडावर सोडण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग ठेवून मुख दर्शनाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती.

महापूजा आरतीनंतर मूर्तींची व मंदिराची पाकळणी करण्यात आली. पाकळणीनंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती घटस्थापनेसाठी वाजत गाजत बालद्वारीत नेण्यात आल्या. येथे अभिषेक पूजा व आरती होऊन उत्सवमूर्तींची घटस्थापना करण्यात आली.

पहा व्हिडिओ : नीरज चोप्राच्या भाल्यासारखा अचूक वेध घेणारे वृत्तपत्र विक्रेते

logo
Pudhari News
pudhari.news