माझ्यामुळे माझ्या बहिणींच्या घरांवर छापेमारी हे दुर्दैव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती | पुढारी

माझ्यामुळे माझ्या बहिणींच्या घरांवर छापेमारी हे दुर्दैव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

देऊळगाव राजे/ कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असताना गुरुवारी सकाळी 6 वाजलेपासून आलेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील दौंड शुगर या साखर कारखान्यावरतीही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.

या पथकाने कारखान्याच्या मुख्य ऑफिसमध्ये चौकशी सुरू असून कारखान्यावर पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा खडा पहारा असून आत व बाहेर एकाही व्यक्तीला जाण्यायेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चौकशीसाठी आलेले पथक नेमकं ईडी, का आयकर विभाग आहे हे अद्याप समजलेलं नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

माझे नातेवाईक असल्याने धाड टाकल्याचे मला वाईट वाटत आहे. माझ्याशी सबंधितांवर छापा टाकला जातो याचा माझ्या नातेवाईकांना त्रास होत आहे. माझ्या नातेवाईकांनी सर्व आयकरचे नियम पाळले. राजकीय हेतुने धाड टाकली की कुठल्या हेतूने धाड टाकली याबाबत आयकर माहिती देईल, असे म्हणाले. मी दर्शनासाठी गेलो होते तेथून येताना छापा टाकल्याचे मला महिती मिळाली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

माझ्या कोल्हापूर आणि इतर बहिणींच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. फक्त नाते असल्याने तीन बहिणींवर कारवाई केली जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापे आजसकाळ पासून टाकण्यात येत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापा टाकल्यामुळे अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले…

राज्यात विविध ठिकाणी जी छापेमारी होत आहे ती राजकीय सुडातून होत आहे. भाजपचा हा राजकीय डाव असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दौंड शुगर कारखान्यावर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर केंद्रीय पथकाने गुरुवारी सकाळी सहा वाजता छापेमारी केली. सुमारे 14 वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम हे कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.

Back to top button