राहुरी : डांबून ठेवलेल्या मुलांना सोडवायला गेलेल्या पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार | पुढारी

राहुरी : डांबून ठेवलेल्या मुलांना सोडवायला गेलेल्या पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार

राहुरी; पुढारी वृत्तसेवा :

राहुरी येथे नुकताच बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करण्यात आले होते. तू माझ्याशी संबंध ठेव असे सांगत मारहाणही केली होती. या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. संबंधित अधिकाऱ्याने खोटा गुन्हा दाखल का केला? असे विचारत महिलेच्या घरी (राहुरी) गोळीबार करून धुडगूस घातला. दरम्यान, संशयिताने संबंधित महिलेच्या मुलांना डांबून ठेवले. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला.

या घटनेत उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डिग्रस येथील त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना दाबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते.

महिलेने प्रसंगावधान राखत मोबाईलवरून परिचितांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. उपअधीक्षक मिटके हे दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते.

अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती अधीक्षक मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके हे थोडक्यात बचावले.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने खंडणीची मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Back to top button