अखेर उजनी धरणाची शंभरी! सलग चौथ्या वर्षी धरण १०० टक्के भरले | पुढारी

अखेर उजनी धरणाची शंभरी! सलग चौथ्या वर्षी धरण १०० टक्के भरले

खेड; विजय सोनवणे : पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासाठी तसेच उस्मानाबादच्या काही भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीने मंगळवार (दि. ५) रोजी मध्यरात्री शंभरी पार केली आहे. सलग चौथ्या वर्षीही सेंच्युरी पार करण्याचा हा मान या जलशयास मिळाला असून संबंध धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या या धरणाच्या पाण्यावर अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे अर्थकारण चालते. गतवर्षी उन्हाळ्यात धरणाचा पाणीसाठा उणे २३ टक्क्यांवर गेला होता. मात्र, पावसाळा सुरू झाल्यावर २२ जुलै रोजी पाणीसाठा वाढत गेला. त्यानंतर ६० टक्क्यांवर आणि ८० टक्क्यांवर काही दिवस हा पाणीसाठा रेंगाळत होता.

पावसाचा जोर खूपच कमी झाल्याने उजनी धरण १०० टक्के भरेल की नाही? याबाबत साशंकता होती. परंतु, मागील चार दिवसांत धरण क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात, मावळ भागात व भीमा शंकरच्या डोंगर परिसरात सुरू असलेल्या पावसाने अखेर हा पल्ला पार केला. पावसाचा जोर असाच राहिला तर हा पाणीसाठी १११ टक्क्यांच्या वर चढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा ११७.२३ टक्के असून मृत पाणीसाठा ६३.६६ एवढा आहे. ५ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री धरण १०० टक्के भरले असून धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत धरणात १११.५९ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणीसाठा होणे नियोजित आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी- जास्त झाल्याने धरण उशिरा भरले.

अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांच्या पाणी पुरवठा योजना उजनीच्या फुगवट्यावर अवलंबून असल्याने या योजना अखंडितपणे सुरू राहून अनेक गावांची तहान भागणार आहे. कर्जत तालुक्यात बागायती क्षेत्र वाढण्यास उजनीचा मोलाचा वाटा आहे. वाढलेले फळबागांचे क्षेत्र व ऊस शेतीमुळे शेतकरी सधन होताना दिसत आहेत.

सध्या दौंडवरून आठ हजार तीनशे तर बंडगार्डनवरून एक हजार आठशे क्‍युसेक्सचा विसर्ग होवू लागला आहे. परंतु, त्या ठिकाणाहून ५० हजार ते १ लाखापर्यंत विसर्ग धरणात होवू लागल्यास धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाईल, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

उजनी धरण १०० टक्के भरण्याची यंदाची ३७ वेळ!

उजनी धरणात मागील ४ महिन्यात एकदाही १ लाख- २ लाख क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही. परंतु, दौंड येथून ३२०० क्युसेक्स ते २५-३० हजार क्यूसेक्सपर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज शंभरी गाठली आहे. धरणाच्या मागील ४२ वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही ३७ वी वेळ आहे.

१९ धरणांपैकी १६ धरणे १०० टक्के भरून ओव्हरफ्लो!

उजनी धरणावरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झालेली आहेत. तसेच यातील ६ ते ७ धरणांमधुन जास्त झालेले एकूण ६ ते ७ हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button