मांडवगण फराटा येथील भर चौकातील एटीएम पळविले | पुढारी

मांडवगण फराटा येथील भर चौकातील एटीएम पळविले

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा:  मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील भर चौकात असणारे एटीएम मशिन चोरट्यांनी दरोडा टाकून पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. ७) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथे मुख्य चौकात इंडिया कंपनीचे एटीएम आहे. हे एटीएम काही दिवसांपूर्वीच नव्याने बसवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी हे एटीएम चोरी झाल्याचे नागरिकांच्या निर्दशनास आले.

या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

गेल्या काही दिवसांपासून मांडवगणफराटा येथील काही ठिकाणावरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी होती. याचाच फायदा घेवून चोरट्यांनी भरचौकात असणारे एटीएम पळविले.

भरचौकात असणारे एटीएम चोरी झाल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पोलिसांना या चोरीचा छडा लावणे एक आव्हानात्मक बनले आहे.

या एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती? हे समजू शकले नाही. पुढील तपास मांडवगण फराटा पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : 150 घड्याळांची टिकटिक ऐकू येते पुण्यातील शाम मोते यांच्या घरी 

Back to top button