साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तश्रृंगी देवी - पुढारी

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तश्रृंगी देवी

कळवण (नाशिक) : बापू देवरे : वणीची सप्तश्रृंगी देवी : अठराभुज, भव्य दिव्य रूप, साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून वणीच्या सप्तशृंगीमातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर दूर आहे. नांदूरी गाव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किलोमीटरचा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत.

सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत…

प्रचंड शीतकडा…

तिर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. हा प्रसिद्ध शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पायऱ्या चढून जाव्या लागतात. इ. स. १७१० मध्ये या पायऱ्या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.

देवीची मूर्ती…

सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मूर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पायऱ्या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणाऱ्या भविकांनी गड गजबजून जातो.

चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साड्यांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात.

ध्वज महात्म्य…

चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढ्या उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहमी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदी यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो.

नवरात्रात भरते यात्रा…

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे…

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगितले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते.

या पवित्र मंदिराच्या आजुबाजूस दाट जंगल आहे. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सप्तशृंगीचं केलं जातं स्मरण…

‘आ’ म्हणजे आत्मा; “ई’ म्हणजे ईश्‍वर यांचा सुंदर दृष्टांत म्हणजे आई. देवाला प्रत्येक घरात जाता आले नाही म्हणून त्याने आईला पाठवले. त्यामुळे जन्मदात्या आईचं स्मरण करतानाच जगदंबेचं म्हणजेच सप्तशृंगीचं स्मरण केलं जातं. त्या वेळी सप्तशृंगी देवीच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या तोंडी दोनच ओळी असतात.

सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता
सप्तशृंगी देवी माता, पायाशी जागा देई आता!

जगात नारायणीचं अठराभुजा सप्तशृंग भव्य रूप जर कुठे बघायला मिळते, ते सप्तशृंगी गडावर, महाराष्ट्रातील आदिशक्ती देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचं मूळ स्थान सप्तशृंग गड हे होय. “ॐकारातील ‘म’ कार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप, पूर्ण रूप आणि हीच आदिमाया असे मानण्यात येते. अठरा हातांची ही महिषासुरमर्दिनी श्री महालक्ष्मी देवी हीच महाकाली व महासरस्वती होय. या त्रिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.

अशी आहे आख्यायिका…

नांदुरी गावापाशी जो पर्वत आहे त्याला सात शिखरे आहेत. त्याच्या एका पर्वतावर या देवीचे स्थान आहे. या सप्तशृंगस्थळी वास्तव्य करणारी ती ‘सप्तशृंगी’ महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विसाव्यासाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे.

लीळाचरित्रातील उल्लेख…

सप्तशृंग गडाबाबत महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही शिलाखंड खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. उपासनेतून मनुष्याला शक्ती प्राप्त होते त्यामुळेच शक्ती म्हणजेच जगदंबेची उपासना केली जाते. जगदंबेची अनेक शक्तिपीठे भूतलावर आहेत. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज आईच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये सापडतो. नवनाथ संप्रदायातील नाथापासूनच पीठाबद्दलचा कालावधी स्पष्ट सांगता येतो. शाबरी कवित्व अर्थात, मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली.

मंदिराची स्थापना…

देवस्थानासंबंधीची आख्यायिका व प्राचीनत्व जाणून घेतल्यानंतर साहजिकच प्रश्‍न पडतो तो या मंदिराची स्थापना कशी झाली, याबद्दल. सप्तशृंगी ट्रस्टची स्थापना २२ सप्टेंबर १९७५ मध्ये झाली. त्याच वेळेस डोंगराच्या खोबणीत श्री भगवतीची मूर्ती समोरील बाजूस २० x२० चा पत्र्याची शेड, अशी परिस्थिती होती; पण विश्‍वस्त मंडळाने याबाबत दूरदृष्टीने विचार करून ६००० चौरस फुटाच्या सभामंडपाचा आराखडा तयार केला. सन १९८२ मध्ये कामास सुरवात झाली.

गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. त्याला पहिली पायरी असं म्हणतात. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाच्या कपारीत आपल्याला भगवतीचे दर्शन घडते. देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ, गळ्यात मंगळसूत्र व पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

देवीची महापूजा…

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर आठ वाजता आईच्या महापूजेला सुरवात होते. त्यामध्ये आईच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून नवी पैठणी वा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. नवीन पानाचा विडा मुखी देऊन पेढा, वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता पार पडते.

गडावर नवरात्र उत्सव
नऊ दिवस विविध देवतांची आराधना, पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दशमीला पूर्णाहुतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्याच दिवशी मंदिराच्या शिखरावर रात्री वणीच्या दरेगावमधील गवळी हस्ते ध्वज लावला जातो. हा सोहळाही खूप पाहण्यासारखा असतो; कारण ध्वज लावण्याचा मान हा पूर्वापार परंपरेनुसार गवळी पाटलालाच आहे. शिवाय एवढ्या उंच शिखरावर ध्वज लावून अंगावर कोणत्याही प्रकारची जखम व धूळ न लागता ही व्यक्ती सुखरूप खाली परतते.
नवीन सुविधा…

गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पायऱ्यांवर छप्पर आले आहे. तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लॅकेंटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने काली आहे.

सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.

श्री सप्तशृंग निवासिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य…

१) गडावर साग ,काग, नाग दिसत नाही. कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ.
२) देवी मध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत, ह्या मिळून देवीचे स्वरुप आहे.
३) वणी गडावर सप्त मातृकाही आहेत.
४) शिवा, चामुण्डा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेयी, नारसिंही ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत.
५) गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधीही गडावर आहे.
६) सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे.
७) राम-रावण युध्दात लक्ष्मण जखमी झाले तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आणण्यास सांगितले. द्रोणागीरी आणताना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला. तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंग गड.
८) गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रम्हदेवाच्या कमंडलू मधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला. तीच गीरिजा (सध्याची गिरणा नदी) नदी आणि त्यापासून हे तीर्थ तयार झाले. ह्यास गीरीजा तीर्थही म्हटले जाते.
९) कालीका तीर्थ हे कूंड कपारीत असून ह्याचे पाणी थंड आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button