यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
गुप्तधनाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी खुद्द बापानेच केली होती. यासाठी मध्यरात्री खड्डा खोदून पूजाही मांडण्यात आली. मात्र, तेवढ्यात घटनास्थळी पोलीस धडकले आणि आरोपी वडील, मांत्रिकासह नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे सोमवारी मध्यरात्री घडला.
मादणी येथील राहत्या घराच्या मागच्या खोलीत गुप्तधन असल्याची चर्चा नेहमी केली जात होती. यातूनच त्या व्यक्तीने मांत्रिकाला पाचारण केले. मांत्रिकाने घराच्या मागच्या खोलीची पाहणी केली आणि गुप्तधन आहे, मात्र ते काढण्यासाठी नरबळी द्यावा लागेल, असे मुलीच्या बापास सांगितले. मुलीच्या वडिलानेही गुप्तधनाच्या हव्यासाने नरबळी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर लगेच घराच्या मागच्या खोलीत खड्डा खोदून पूजा मांडण्यात आली.
ज्या मुलीला नरबळी द्यायचे होते, ती मुलगी मांत्रिक आणि वडिलांचे बोलणे बाजूच्या खोलीच्या दाराच्या फटीतून ऐकत होती. नरबळीचे नाव निघाल्यानंतर आणि त्यात माझाच बळी द्यायची चर्चा सुरू आहे, हे ऐकल्यानंतर ही मुलगी गर्भगळीत झाली. तिने तातडीने आपल्या मोबाईलमधून वडील आणि मांत्रिकात सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ शूट केला तसेच खोदलेला खड्डा आणि मांडलेल्या पूजेचे फोटो काढले आणि हा व्हिडिओ आणि फोटो तिने यवतमाळ येथील आपल्या मित्राला पाठविला. त्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ यवतमाळ पोलिसांना ही माहिती दिली. यवतमाळ पोलिसांनी या प्रकाराची माहिती तातडीने बाभूळगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मादणी येथे धाव घेऊन मांत्रिक आणि प्रमुख आरोपी मुलीच्या वडिलाचे मनसुबे उधळून लावले. यावेळी पूजेचे साहित्य, टोपले, फावडे, फुलांचा हार, आदी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, जमादार दिगंबर अलामे, सागर बेलसरे, गणेश शिंदे, आदींनी पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
या प्रकरणात राजकुमार जयंत धकाते, विजय शेषराव बावणे, रमेश कवडूजी गुंडेकार, वाल्मिक रमेश वानखडे, विनोद नारायण चुनारकर, दीपक महादेवराव श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार या सात आरोपींसह राळेगाव येथील दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी यवतमाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रवींद्र जेधे करीत आहेत.
हे ही वाचा :