पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील एका मंदिराच्या रथोत्सवात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या रथोत्सव मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने ११ भाविकांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश आहे. संपूर्ण तंजावर परिसर या घटनेने हादरला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरु आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नऊ फूट उंचीचा रथ फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला होता. रथाला पॉवर जनरेटरने वीज पुरवठा केला होता. मृतांमध्ये जनरेटर ऑपरेटरचादेखील समावेश आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर PMNRF कडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. जखमींना ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने भाविकांमध्ये गोंधळ उडाला. यामुळे अनेकजण जखमी झाले. तंजावरमधील मंदिरात ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पण या उत्सवात विजेचा धक्का बसून मोठी जीवितहानी झाली.
या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तमिळनाडूतील तंजावर येथे झालेल्या दुर्घटनेने खूप दुःख झाले. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की जखमी लवकर बरे होतील. असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
तंजावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कालीमेडू येथील अप्पार मंदिरात घडली. रथयात्रा मंदिरातून निघाल्यानंतर वळण घेत असताना मिरवणूक मार्गात असणाऱ्या विद्युत तारांमुळे रथ पुढे नेण्यास अडथळा येत होता. म्हणून हा रथ मागे घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, याच दरम्यान रथाला हाय होल्टेज असणाऱ्या वायरचा स्पर्श झाला आणि संपूर्ण रथात विद्युत प्रवाह पसरला. या दुर्घटनेमुळे लहान मुलांसह काही लोकांना जीव गमवावा लागला.