

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन वर्षात कोरोनासारख्या जागतिक महामारीने मानवी जीवन विस्कळीत केले आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. तेवढ्यात आणखी एक नवा विषाणू आढळला आहे. जगातील पहिला एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लू चीनमध्ये सापडला आहे. यामुळे चीनसह जगभरात खळबळ उडाली आहे. (H3N8 Bird Flu) हा विषाणु प्रथमच चीनमध्ये सापडल्याने काेराेनातून सुटका हाेत असताना या नव्या विषाणूमुळे चिंतेत भर पडली आहे.
चीनमधील हेनान प्रांतातील चार वर्षीय मुलाच्या शरीरात एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लूचे संक्रमण आढळले आहे, अशीही माहीती चीनच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे. चीनमधून सुरु झालेल्या कोरोना संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला आहे. यानंतर पहिल्यांदाच मानवी शरीरात एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लू संक्रमण आढळले आहे. आरोग्य तज्ज्ञांसाठी हा विषय चिंतेचा बनला आहे; पण चीनने दावा केला आहे की, एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लुचा संसर्ग इतर लोकांमध्ये होण्याची शक्यता कमी आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC ) माहिती दिली की, हेनान प्रांतातातील चार वर्षीय मुलात एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लुचे संक्रमण आढळले. त्याला ताप आणि इतर काही लक्षणे आढळली. तपासणीनंतर त्याला एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लुची लागण झाल्याचे स्पष्ट आले.त्याच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेले नाही. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहीतीनुसार संक्रमित मुलगा आपल्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता.
आतापर्यंत एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लुचे संक्रमण घोडे, कुत्रे आणि पक्षी यांच्यामध्ये आढळत असे. आतापर्यंत मानवामध्ये याचे संक्रमण आढळले नव्हते. हेनान मधील हा मुलगा जगातील पहिला एच३एन८ (H3N8) बर्ड फ्लुचे संक्रमित रुग्ण ठरला असल्याचे आराेग्य विभागाने म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ : कोरोना लस : बूस्टर डोसची गरज आहे का?