ठाण्यात मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न | पुढारी

ठाण्यात मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : भूतप्रेतांंचा शोध घेऊन तंत्रमंत्राद्वारे त्यातून मुक्ती मिळवून देतो, असे व्हिडीओ बनवून ते युट्युबवरून प्रसारित करून लोकांना गंडा घालणार्‍या भोंदूबाबाला त्याच्या साथीदारांसह चितळसर पोलिसांनी गजाआड केले. या बाबाने एका अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

कुलदीप प्रदीप निकम (पोखरण रोड, वर्तकनगर, ठाणे) असे त्या भोंदूबाबाचे नाव असून त्याचे साथीदार किशोर देविदास नवले (विक्रोळी), स्नेहा नाथा शिंदे (वर्तकनगर, ठाणे) यांनाही अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेतील मुख्य आरोपी कुलदीप प्रदीप निकम याने त्याच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाचा शारीरिक छळ करून त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी चितळसर पोलिसांत 13 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीप प्रदीप निकम याच्यासह त्याचे साथीदार किशोर देविदास नवले, स्नेहा नाथा शिंदे यांना 13 व 14 मार्च रोजी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

भूत शोधण्याचे अन् पैसे मोजण्याचे मशिन!

कुलदीप निकम याने भोंदूगिरीच्या कामासाठी दत्त प्रबोधिनी नावाची संस्था स्थापन केली होती. त्याचप्रमाणे तो ‘पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी’ नावाचे युट्यूब चॅनलदेखील चालवायचा. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, सापाचे कातडे, ‘घोस्ट डिटेक्टर’ (भूत शोधण्याचे मशीन), महागडे लॅपटॉप, नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, तंत्रमंत्र विद्येची पुस्तके, त्रिशूळ, होमहवन करण्याचे साहित्य, पैस मोजण्याचे मशिन असे साहित्य आढळले.

वाघाचे कातडे, काळ्या बाहुल्या, कावळ्याचे पंख…

कुलदीप निकमचा साथीदार किशोर देविदास नवले याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात दोन वाघांचे कातडे, हॅलोजन लाईट, काळ्या बाहुल्या, कावळ्याचे पंख असे साहित्य सापडले. या भोंदूबाबांनी भूतबाधा उतरवून देतो असे भासवून तथाकथित भूतप्रेताचे व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित करून अनेक लोकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. निकम, नवले यांच्यासह स्नेहा शिंदे या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Back to top button