वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव केसरे या दुर्दैवी बालकाच्या हत्येचे गूढ उकलण्यात शाहूवाडी पोलिसांना बुधवारी (दि.6) सायंकाळी यश मिळाले. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या कोवळ्या आरवची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. राकेश रंगराव केसरे (वय 27, रा. कापशी, ता. शाहूवाडी) असे खुनी बापाचे नाव आहे. रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या आरवचा राकेशने भितीपोटी गळा आवळून जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंविसं कलम 302, 201 अन्वये अनुक्रमे हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे शाहूवाडी नरबळी प्रकरण असल्याचे मानले जात होते. मात्र या पाठीमागे कोणतीही अंधश्रध्दा नसून रागा पोटी पित्याने स्वत:च्या पोराचा बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान शाहूवाडी नरबळी प्रकरण वाटत होते पण पोलिसांच्या तपासाने प्रकरणाला पूर्ण पणे कलाटणी दिली. दिवसभराच्या पोलिस तपासानंतरही बालकाच्या हत्येचे गूढ कायम होते. तपास यंत्रणेने या संवेदनशील प्रकरणी जवळच्या नातलगांसह जवळपास 12 ते 15 जणांची कसून चौकशी केली. यामध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत होती. माहितीतील विसंगतीमुळे हा तपास ठोस निष्कर्षाप्रत पोहचला नसल्याचे सांगत यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली होती. मात्र एकंदर पोलिसांच्या हालचालींवरून या निरागस बालकाच्या हत्येमागील सूत्रधार म्हणून जवळच्या नातलगांवरच संशयाची सुई स्थिरावल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते.
बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित राकेशला चौकशीच्या बहाण्याने स्थानिक तपास केंद्राच्या ठिकाणी बोलावून घेत ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी त्याची पत्नी साधना, सासू, सासरा तसेच अविवाहित मेव्हणी यांना बांबवडे पोलिस दुरक्षेत्रात हलविले आणि तात्काळ राकेश याला बोलते करत पोलिसांनी त्याच्याकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
रविवारी सायंकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी चहा पिण्याची राकेशला इच्छा झाली. यावेळी त्याने घराबाहेर गेलेल्या पत्नी साधनाला बोलावून आणण्यास आरवला सांगितले, मात्र त्यास आरवने नकार दिल्याने राग अनावर झालेल्या राकेशने आधी भिंतीवर आणि पाठोपाठ आरवच्या छातीत जोराचा ठोसा मारला. यात आरव बेशुद्ध पडला. यावेळी राकेशने भीतीपोटी आरवचा गळा दाबून खून केला आणि लगबगीने घरामागील पडक्या खोलीत मृतदेह दडवून ठेवला. संशय येऊ नये म्हणून त्याने आरव बेपत्ता झाल्याचा बनाव रचला आणि पोलिसांत फिर्याद देऊन निमूटपणे सरुड येथील हॉटेलवर कामावर गेला.
दरम्यान, राकेशनेच रात्रीच्या सुमारास आरवचा मृतदेह हळद, कुंकू आणि गुलालाने माखून घराजवळच्या बोळात टाकल्याचे समोर आले आहे.
पत्नी साधना हिचाही काटा काढण्याचा राकेशने कट रचला होता. दोघांमध्ये असणारा बेबनाव हे त्यामागे कारण होते. परंतु आरव बेपत्ता झाल्याच्या बातमीने घरात पै-पाहुणे, नातलगांची वर्दळ असल्याने त्याचा तो कट असफल ठरला होता. यात पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवत साधनाला जाणीवपूर्वक त्याच्यापासून दूर ठेवत तपास गतिमान करून राकेशच्या मुसक्या आवळल्या. पत्नीची हत्या करूनच आपण स्वतःपोलिसांत हजर राहणार होतो, असा कबुली जबाबही संशयीत राकेशने पोलिसांना दिला आहे.
दरम्यान हत्येचे गूढ उकलण्यात दिरंगाई होत असल्याने कापशी गावात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. जलदगतीने तपास करून संशयीतांना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी जमाव गोळा करू पाहणार्यांना डीवायएसपी साळुंखे आणि पोलिस निरीक्षक पाटील यांनी संयम बाळगण्याचे केलेले आवाहन सफल ठरले. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने संशयितांचे फोन कॉल तपशील तसेच सोशल मीडियावरील संभाषणात मिळणार्या माहितीनुसार गावातील काहीजणांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागत असताना दिवसभर अफवांचे पीक उठत राहिले.
दरम्यान शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आरवचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी वजनदार वस्तूचा घाव बसून छातीच्या दोन बरगड्या तुटलेल्या आढळून आल्या होत्या.
जिल्हा पोलिस प्रमुखांसह वरिष्ठांशी संपर्क राखत अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कापशी गावात दिवसभर तळ ठोकला होता. अंधश्रद्धेचा या हत्येशी दुरान्वये संबंध नसल्याचे सांगणार्या तपास यंत्रणेने गावातील देवऋषी तसेच गंडेदोर्यांशी निगडित घटकांना चौकशीसाठी दोन ते तीनवेळा पाचारण केल्याने घटनेतील संभ्रम वाढला होता. दुसर्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह काही पुरोगामी विचारांच्या संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाला निवेदन सादर करून गुन्ह्याची उकल करण्याचा तगादा लावला होता. अखेर फिर्यादी बापच निरपराध आरवचा मारेकरी निष्पन्न झाल्याने नरबळी, भानामती या चर्चित प्रकारावर पडदा पडला आहे.