गडचिरोली : मृत्यूस प्रभारी अधिकारीच जबाबदार : आत्महत्या करणाऱ्या जवानाची सुसाईड नोट व्हायरल | पुढारी

गडचिरोली : मृत्यूस प्रभारी अधिकारीच जबाबदार : आत्महत्या करणाऱ्या जवानाची सुसाईड नोट व्हायरल

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात पोलिस शिपाई हितेश भैसारे याने सोमवारी (दि. २५) सकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. यानंतर हितेशची सुसाईड नोट सापडली असून, त्यात त्याने आपल्या मृत्यूस प्रभारी पोलिस अधिकारी योगीराज जाधव हेच जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.

हितेश भैसारेकडील सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वी मी सी-६० पथकात होतो. त्यावेळी प्रभारी अधिकारी एपीआय योगीराज जाधव यांच्याशी माझा शाब्दीक वाद झाला होता. त्यानंतर मी रजेवर असताना जाधव यांनी मला कुठलीही पूर्वसूचना न देता प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कसुरीवर संलग्न बदली केली. यामुळे मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

यासंदर्भात मी आधी झालेल्या शाब्दीक वादाबद्दल माफी मागून बदली रद्द करण्याची मागणी देखील केली होती. परंतु, एपीआय योगीराज जाधव तसेच वरिष्ठांनी माझे काहीही ऐकले नाही. परिणामी, माझ्या कुटुंबाचे होणारे हाल बघून हे पाऊल उचलत आहे, असे हितेश भैसारे याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांना मिळाली नाही सुसाईड नोट

सुसाईड नोटबद्दल अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांना विचारणा केली असता, सुसाईड नोट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. मात्र, पोलिसांना ती अद्याप मिळालेली नाही, असे ‘पुढारी’ला सांगितले. सुसाईड नोट प्राप्त झाल्यानंतर त्या दिशेन तपास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button