देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षणाची गरज : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून, जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्‍यक्‍त केले.  श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही त्‍यांनी या वेळी दिली. फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन पार पडले. यानंतर ते बाेलत हाेते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेने क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधीलकीचे उपक्रमही सातत्याने राबविले. खेळ व व्यायाम एवढेच मर्यादित क्षेत्र न ठेवता मानवतेचा विचार करणारी संस्था आहे. संस्थेचे क्रीडा विद्यापीठ झाले पाहिजे, अशी मागणी आहे. जगभर खेळ विविध प्रकारे विकसित होत असताना व अनेकविध क्रीडाविषयक संधी उपलब्ध होत असताना देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेचे विद्यापीठ करण्याबाबत लवकरच एक समिती स्थापन करून सकारात्मक कार्यवाही करू. त्याचप्रमाणे, संस्थेचे वसतिगृह तसेच इतर उपक्रमांसाठी निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

, क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधीलकी जपत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अमरावतीच्या गौरवात भर घातली आहे. मला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून बोलावले असले तरी मला येथे येताच येथील विद्यार्थी जीवन आठवले. मी येथील विद्यार्थी आहे. येथे स्वीमिंग, लाठीकाठी व अनेक खेळ शिकलोया गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे. या संस्थेच्या अनेक स्मृती मनात आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

अतिशय विपरीत परिस्थितीत काम करून मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या नावे संस्थेत इनडोअर स्टेडियम निर्माण झाल्याचा आनंदही यावेळी त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळाडूंकडून तायक्वांदो, बॉक्सिंग व कबड्डीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.

मंडळातर्फे स्थापनेपासून क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर राहून अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. दंगली रोखण्यासाठी व सामाजिक एकोपा राखण्यासाठी कार्यक्रम, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागृती अभियान तसेच कोविडच्या काळात महत्वपूर्ण उपक्रम येथील स्वयंसेवकांनी राबवले. संस्थेत भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी शिकत आहेत. संस्था संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत असून एका अर्थाने हा 'मिनी भारत' आहे. या 'मिनी भारता'तर्फे स्वागत करत असल्याचे पद्मश्री वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेतर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिव माधुरीताा चेंडके यांनी आभार मानले.

कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, दीप्तीताई चौधरी, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरीताई चेंडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news