

मोशी : महापालिका हद्दीत येणार्या चर्होली बुद्रुक येथील झाडा-झुडपांची अवाढव्य वाढ झाली आहे. तरीही पालिकेच्या उद्यान विभागाचे याच्या छाटणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे फुटपाथ खुरट्या गवताने व्यापल्याचे चित्र आहे. रस्त्याच्याकडेची झाडे-झुडपे वाढली असून शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. यासाठी पालिकेचा स्वतंत्र विभाग असताना सदर चित्र वाढत जात असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवरती नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे.
याबाबत विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार केल्यास तेदेखील दुर्लक्ष करत असल्याचे माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी सांगितले. नागरिक वारंवार गवत काढण्याची मागणी करत असले तरी पालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. या गवतामुळे किडे प्रादुर्भाव वाढत आहे. गवतात पाणीसाचून राहत असून डासांचा उपद्रव वाढला आहे. गवतात साप, विंचूची भीती असल्याने नागरिक फुटपाथवरून चालणे टाळतात. रस्त्याच्याकडेच्या बाभळी वाढल्या असून त्यांचा वाहनांना त्रास होताना दिसून येतो. सफाई कर्मचारी हे काम आरोग्य विभागाचे नसल्याचे सांगतात तर उद्यान विभागा सदर कामाकडे दुर्लक्ष करताना दिसून येते.
झाडे-झुडुपे वाढली असताना त्याच्या छाटणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसून येते. आठ महिन्यांपासून वारंवार तक्रार केली जात असतानादेखील छाटणी होत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कुठे असा प्रश्न नागरिक विकास बुर्डे यांनी व्यक्त केला आहे.