राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तिघा भामट्यांनी घरात प्रवेश करून 10 हजार रूपये रोख रक्कम व गॅसची टाकी चोरून नेत असताना गावकर्यांनी दोघा जणांना रंगेहाथ पकडले तर एकजण पळून गेला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी तालुक्यातील मुसळवाडी येथे घडली.
मुसळवाडी येथील दत्त नगर परीसरातील कड वस्ती येथे विकास एकनाथ कड यांच्या घरात 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान तिन भामट्यांनी प्रवेश केला.
त्यांनी घरातील टेबलवर ठेवलेली 10 हजार रूपये रोख रक्कम असलेली पिशवीसह 3 हजार रूपये किंमतीची गॅस टाकी असा एकूण 13 हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन मोटारसायकलवरुन पसार होत असताना गावातील शांतीलाल अशोक लोहकरे, मच्छिंद्र बाबूराव जगधने व छोटू मिठू शेख या तिघांनी या भामट्यांना मुद्देमालासह पकडले.
किशोर जनार्दन बर्डे, सुनिल रमेश बर्डे व राजू गोमा बर्डे (तिघे रा. मुसळवाडी, ता. राहुरी) अशी पळून जाणार्यांची नावे आहेत. यापैकी किशोर जनार्दन बर्डे पसार झाला आहे. विकास एकनाथ कड यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पो. नि. प्रताप दराडे व पो. ह. नवनाथ भिताडे करीत आहेत.