औरंगाबाद : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी असाही जिवघेणा प्रवास.. | पुढारी

औरंगाबाद : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी असाही जिवघेणा प्रवास..

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने लाकडी दांडीचा आधार घेऊन शाळा गाठावी लागते. भविष्यात काही तरी बनायचे या जिद्दीतून त्यांचा रोजचा हा जिवघेणा प्रवास सुरू आहे.

चिखलठाण गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर कन्नड व खुलताबाद तालुक्याच्या सीमेवर शेतात राहणार्‍या 12 मुली व 18 मुले या शाळेत शिक्षण घेतात. मागील महिन्यात सतत झालेल्या पावसाने गांधारी नदीला चांगले पाणी आहे. या नदीचे पात्र ओलांडून विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. हे पात्र ओलांडने मात्र एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतणारे ठरेल अशी स्थिती आहे.

या नदीवर पूल नाही व सध्या पाणी असल्याने लाकडाच्या दांडीला धरून नदीचे पात्र त्यांना पार करावे लागते. एखाद्याचे छातीचे ठोके चुकेल अशी परिस्थिती यावेळी असते. आपल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे, जगाच्या स्पर्धेत तो टिकावा अशी इच्छा सर्वच पालकांची असते. यातूनच विद्यार्थी जेव्हा नदीचे पात्र पार करतात तेव्हा पालक लाकडाची लांब बल्‍ली खांद्यावर धरून दोन्ही बाजूला उभे राहतात. याच लाकडाच्या बल्‍लीला लोंबकळत विद्यार्थ्यांना नदीचे पात्र पार करावे लागते. एखाद्याचा हात निसटला तर ही भीती सतत असते. शिक्षण थांबविणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी आर्त हाक देऊनही ढिम्म प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल कायम आहे. या नदीवर चांगला पूल बांधण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सहावीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून मांडली समस्या

लाकडी दांडीला लटकून नदीचे पात्र ओलांडणार्‍यांत इयत्ता सहावीतील शिवराज प्रमोद चव्हाण हादेखील आहे. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना त्याने रस्त्याची समस्या सांगितली. फाड फाड इंग्रजीतून संवाद साधत त्याने आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाची गुणवत्तादेखील सिद्ध केली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यार्‍या या गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र नदीवर पूल नसल्याची झळ बसत आहे.

Back to top button