मावळ्यांनी 75 वेळा केला ‘राजगड’ सर ! | पुढारी

मावळ्यांनी 75 वेळा केला ‘राजगड’ सर !

वडगाव मावळ : 15 जणांची कोअर टीम, 8 तासांचा कालावधी, 47 जणांचा सहभाग अन् सर्वांच्या सहकार्याने एका दिवसात तब्बल 75 वेळा राजगड किल्ला चढून पुणे जिल्ह्यातील मावळ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सलामी देण्याचा प्रयत्न यशस्वी केला.
पुणे जिल्ह्यातील कोंढवे धावडे, शिवभूमी भ्रमंती, सीएएफव्हीडी खडकी, वडगाव मावळ येथील दुर्गसंवर्धन संस्था व जिवाभावाची माणसं या शिवभक्त संस्थांच्या मावळ्यांनी ही ऐतिहासिक मोहीम राबवून अनोखी सलामी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपण तो कशा पद्धतीने साजरा करायचा असा प्रश्न पडला असताना स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड सर करण्याचे निश्चित झाले; पण अमृत महोत्सवाला साजेशी सलामी देण्याचा विचार सुरू असताना 15 ऑगस्टला 15 जणांच्या कोअर टीमने 8 तासांत 47 सहकार्‍यांसह 75 वेळा राजगड चढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राजगड सर करण्यास सुरुवात झाली. या पूर्ण मोहिमेत 16 जणांनी प्रत्येकी 5 वेळा तर 8 जणांनी प्रत्येकी 4 वेळा, एकाने 3 वेळा, एकाने 2 वेळा तर इतरांनी प्रत्येकी एकदा याप्रमाणे सर्वांनी मिळून तब्बल 75 वेळ राजगड सर करून स्वातंत्र्यदिनाची अनोखी सलामी देऊन ही मोहीम यशस्वी केली.

गडावरील खंडोबाच्या माळावर व पद्मावती मंदिराजवळ 30 बाय 20 फूट लांबी रुंदीचा तिरंगा ध्वज फडकवत भारतमातेचा नामघोष करण्यात आला. प्रशासकीय अधिकार्‍यांना व नवीन सहकार्‍यांना गडाविषयी, इतिहासाविषयी, इथल्या भौगोलिक परिस्थिती विषयी माहिती देण्यात आली.

Back to top button