नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पांडवलेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या परिवाराने ट्रेकिंगचे कोणतेही साहित्य न वापरल्याने तोल जाऊन पाय घसरल्याने बाप आणि लेक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नाशिक क्लाइम्बर्स ॲण्ड रेस्क्यू असोसिएशनच्या समूहाने सुखरूप सुटका करून खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.
पांडवलेणी येथे पर्यटक साबियो सांचेस (40, मरोळ, मुंबई) हे 3 वर्षांच्या मुलीसह शनिवारी (दि.20) दुपारी 12:30 च्या दरम्यान लेणी क्र. 20 पाहत असताना त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे पावसाने ओल्या झालेल्या निसरड्या दगडावरून मुलीसह सांचेस हेदेखील घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. या प्रकरणी माहिती मिळताच घटनास्थळी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे कर्मचाऱ्यांसह पोहोचले. तोपर्यंत रेस्क्यू टीम असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष दयानंद कोळी यांनी त्वरित मदतकार्यासाठी नीलेश पवार, चंद्रकांत कुंभार, ओम उगले, अक्षय गाडगीळ यांच्या समूहाने घटनास्थळी धाव घेत अपघातस्थळाची पाहणी केली. तसेच दुसरी रेस्क्यू टीमचे अभिजित वाकचौरे, ऋषिकेश वाकचौरे, अजय पाटील, वेदांत वाणी यांनीदेखील साहित्य घेऊन मदतकार्य सुरू केले. तीन तासांच्या खडतर परिश्रमानंतर पर्यटक बाप-लेकीला स्पेशल स्ट्रेचरच्या साह्याने लेणीच्या पायथ्याशी सुखरूप वाचवण्यात यश आले. यावेळी जखमी पर्यटकांसोबत असलेल्या सांचेस यांच्या पत्नीने त्वरित पती व मुलीला रेस्क्यू टीमच्या मदतीने खासगी दवाखान्यात दाखल केले. बचावकार्यात अग्निशमक दलाचे एस. के. शिंदे, बी. एन. खोडे, आर. एस. नाकील, एम. एस. गांगुर्डे व जे. एस. सांचेस यांच्यासह असोसिएशनने मोलाची मदत केल्याबद्दल सांचेस परिवाराने त्यांचे आभार मानले.
लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांनी पायात चप्पल घातली असल्याने निसरड्या दगडावरून घसरल्याने अपघात झाला. ट्रॅकला जाताना काळजी घ्यायला हवी. पावसाच्या दिवसात उंच ठिकाणी लहान मुलांना नेण्याचे टाळावे. – दयानंद कोळी, नाशिक क्लाइम्बर ॲण्ड रेस्क्यू असोसिएशन.
धाेकादायक पाॅइंटबाबत सूचना फलकच नाही
जगद्विख्यात पांडवलेणी परिसरात कोणत्याही प्रकद्च्या सुरक्षेबाबतचा सूचना फलक व अपघाती ठिकाणी बॅरिकेड्स नसल्याने असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. लेणी पाहण्यासाठी फक्त प्रवेश फी आकारली जाऊन गल्ला गोळा करण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना धाेकादायक पाॅइंटबाबत कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.