फिल्म एडिटिंगमध्ये करिअर करा

फिल्म एडिटिंगमध्ये करिअर करा
Published on
Updated on

चित्रपट निर्मितीत एडिटिंग अर्थात संपादनाला विशेष महत्त्व आहे. चित्रपटातील सलगपणा कायम ठेवताना त्यात कोणताही रसभंग होणार नाही याची पुरेपूर काळजी फिल्म एडिटरला घ्यावी लागते. चित्रपटातील अनावश्यक भाग काढणे, तोचतोपणा वगळणे यात संपादन कौशल्य असते. एखादा क्लायमॅक्स किती वेळ ताणायचा किंवा कुठे संपवायचा यासाठीही फिल्म एडिटरला सजग राहावे लागते.

चित्रपटाचे तीन टप्प्यांत एडिटिंग होते. एडिटरने कापलेली द‍ृश्ये, दिग्दर्शकाने कापलेले द‍ृश्य आणि शेवटची काटछाट या प्रक्रियेतून चित्रपटाचे संपादन होत असते. चित्रपट संपादन करताना काही निकष पाहावे लागतात. भावना, कथानक, श्रोताकेंद्रित संवाद, द‍ृश्य, संगीत, टू डी किंवा थ्री डी इफेक्ट. आजकाल चित्रपटाबरोबरच खासगी दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणार्‍या मालिकांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने या क्षेत्रातील करिअरला भरपूर वाव निर्माण झाला आहे. ज्या युवकांना चित्रपटाचे ज्ञान आणि आवड आहे, अशा मंडळींनी एडिटिंगमध्ये संधी घेण्याचा प्रयत्न करावा.

आजघडीला भारतातील नामांकित फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म एडिटिंगबाबत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये करता येतात. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

  • करिअरसाठी संधी :

भारतात दरवर्षी एक हजार चित्रपटांची निर्मिती होते. जगातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीत आज हजारो मंडळी अहोरात्र काम करताना दिसतात. पडद्यावर आणि पडद्यामागची मंडळी आपला चित्रपट अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. आपले कौशल्य पणाला लावून चित्रपटाचा दर्जा राखला जातो.

संगीत, संपादन, अभिनय, संवाद, वितरण व्यवस्था अधिकाधिक निर्दोष राहावी यासाठी मनुष्यबळ कुशल असणे गरजेचे असते. त्यामुळे कुशल संपादनाची नेहमीच चित्रपटसृष्टीला गरज राहिलेली आहे.

  • महाविद्यालय

भारतात अनेक राज्यांत चित्रपटविषयक व्यावसायिक शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. त्यापैकी काही नामांकित संस्थांचा याठिकाणी उल्लेख करता येईल. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकता, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.
जगदीश काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news