सीपीआर : पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मंजुरीसाठी जनआंदोलनाची गरज! | पुढारी

सीपीआर : पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मंजुरीसाठी जनआंदोलनाची गरज!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

100 वर्षांची रुग्णसेवेची परंपरा, 650 खाटांचे सुसज्ज रुग्णालय, बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान एक हजार रुग्णांची तपासणी आणि दररोज किमान छोट्या-मोठ्या 50 हून अधिक शस्त्रक्रिया… एवढा मोठा कार्यभार असलेल्या रुग्णालयावर कोणी अपुर्‍या कार्यभाराचा शिक्का मारेल? कोल्हापुरातील प्रसिद्ध छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाबाबत (सीपीआर) हा नवा अनुभव आला आहे.

सतत रुग्णांच्या गर्दीने गजबजलेल्या आणि रुग्ण ठेवण्यास जागा नाही, अशी स्थिती अनुभवत असलेले हे रुग्णालय ज्याच्याशी संलग्‍न आहे, अशा कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पुरेसा कार्यभार (वर्कलोड) नसल्याचे कारण सांगून राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने मंजुरी नाकारली. परिषदेचे ही कृती कोल्हापूरवर अन्याय करणारी आहे. यामुळे राजर्षींच्या नावाने चालविल्या जाणार्‍या आणि गोरगरिबांच्या रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या या महाविद्यालयावरील अन्याय दूर करण्यासाठी नागरिकांनी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने गेल्या आठवड्यात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी, अ‍ॅनेस्थेशियालॉजी, ईएनटी व बायोकेमिस्ट्री या चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अनुमती नाकारल्याचे कळविले. या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणात या विभागांमध्ये पुरेसा कार्यभार (वर्कलोड) नसल्याचे नमूद केले आहे. मेडिकल कौन्सिलच्या तपासणी पथकाच्या या निष्कर्षावर वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पुरेसा कार्यभार नाही, हे कारण सीपीआर रुग्णालयाला लागू होऊ शकत नाही. यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची अनुमती नाकारता येत नाही, या मतावर अनेक जण ठाम आहेत. यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाने मेडिकल कौन्सिलकडे संबंधित निर्णयाविरोधात अपील करण्याची तयारी केली आहे. तसे अपील दाखलही होईल. परंतु; जोपर्यंत या अन्यायाविरुद्ध जनमताचा रेटा उभारला जात नाही, लोकप्रतिनिधी आणि शासन हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत, तोपर्यंत हा अन्याय दूर होणे अवघड आहे. त्यातही चालू शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमाची मंजुरी हवी असेल, तर जाणत्या कोल्हापूरकरांसाठी एकेक दिवस महत्त्वाचा आहे.

हे रुग्णालय सध्या कोल्हापूरचाच नव्हे, तर शेजारील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोरगरिबांचा आधारस्तंभ म्हणून उभे आहे. या रुग्णालयात दररोज सरासरी एक हजारहून अधिक रुग्ण उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तर एखादा रुग्ण गंभीर झाला की, सर्वसामान्य गोरगरीब कोकणवासीयांचा सीपीआर हा सर्वात मोठा आधार आहे.

अवघड, गुंतागुंतीच्या आणि खासगी रुग्णालयांनी नकार दिलेल्या दररोज 50 हून अधिक शस्त्रक्रिया या रुग्णालयात होतात. शिवाय दररोज 150 हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखलही होतात. मग या रुग्णालयात कार्यभार कमी कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.

निरीक्षकांच्या अहवालाचा वैद्यकीय महाविद्यालयाला फटका

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे पथक कोरोना दुसर्‍या लाटेला प्रारंभ होताना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी सीपीआर रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केले होते. सर्व कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याने शासनाच्या आदेशानुसार अन्य विभागांतील शस्त्रक्रिया आणि उपचार बंद होते. अशावेळी पथक ज्या दिवशी तपासणी करत होते, त्या दिवशी हा कार्यभार दिसणे अशक्य होते. नेमके या स्थितीवर बोट दाखवत या निरीक्षकांनी आपला अहवाल सादर केला. त्याचा फटका मात्र राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसला आहे.

(पूर्वार्ध)

Back to top button