पॉलिटेक्निक महाविद्यालये १ ऑक्टोबरपासून सुरू | पुढारी

पॉलिटेक्निक महाविद्यालये १ ऑक्टोबरपासून सुरू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : तंत्रसंचालनालयाच्या दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत तब्बल 40 हजार 965 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

दुसर्‍या कॅप राऊंडसाठी तब्बल 60 हजार जागा उपलब्ध झाल्या असून या जागावर पसंतीक्रम भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस आहे. या फेरीत जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरावे असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी 366 संस्थात 1 लाख 1 हजार जागा आहेत. या जागावर यावर्षी सुमारे 88 हजार अर्ज आले होते.

त्यापैकी पहिल्या कॅप राऊंडमध्ये 71 हजार 944 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरुन प्रवेशासाठी आपले अर्ज भरले होते. त्यामधील 55 हजार 633 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या होत्या यापैकी 40 हजार 965 विद्यार्थ्यांनी फ्रीज करुन आपला प्रवेश निश्चित केला आहे.

त्यानंतर आता दुसरी फेरी होणार आहे. यासाठी सुमारे 60 हजार जागा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी पसंतीक्रम विद्यार्थ्यांना 28 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. 30 सप्टेंबरला जागा वाटप होतील त्यानंतर दुसर्‍या कॅप राऊंडचे प्रवेश होतील.

पॉलिटेक्निक महाविद्यालये 1 ऑक्टोबरपासून

पहिल्या कॅप राउंडचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर दुसरी फेरी 2 ते 3 ऑक्टोबरला पूर्ण होईल या दोन्ही कॅप राऊंड नंतर समुपदेशनाची फेरी होणार आहे. या फेरीत रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्यक्ष महाविद्यालयांना 1 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश वाढणार

दहावीचा निकाल वाढल्याने यंदा प्रवेश वाढणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी विद्यार्थी प्रतिसाद चांगला आहे. महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, अभ्यासक्रमांची माहिती आदी उपक्रमाची माहिती संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. यामुळे प्रक्रिया विद्यार्थ्यांना सोपी गेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात वाढ होतील अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. कॅप राउंड मधून प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा होणार आहे.

Back to top button